Join us

... तर राज्यातील शाळांना आजपासूनच सुट्टी; शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 5:53 PM

शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी काढलेल्या पत्रकानुसार, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे.

मुंबई - राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा राज्यातील शाळांना २ मे पासून सुट्टी जाहीर झाली असून ही सुट्टी ११ जूनपर्यंत असणार आहे. तर, विदर्भातील शाळा मात्र उन्हाळ्याची तीव्रता पाहता ३० जूनपर्यंत सुट्टी देण्यात आली आहे. शिक्षण विभागाने परिपत्रक जारी करत यासंदर्भात माहित दिली होती. मात्र, वाढत्या उन्हाचा कहर पाहता याच आठवड्यापासून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येईल. याउलट, मी शाळांना अहवाल मागवले आहेत, शक्य झालं तर आजपासूनच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  

शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी काढलेल्या पत्रकानुसार, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे. २ मे पासून सुरू झालेली उन्हाळी सुट्टी ही ११ जूनपर्यंत असणार आहे. तर, राज्यभरातील नव शैक्षणिक वर्ष हे जून महिन्याच्या दुसऱ्या सोमवारपासून म्हणजेच १२ जून पासून सुरू केले जाणार आहे. तर. विदर्भातील कडक उन्हाळा लक्षात घेता त्या भागातील नवं शैक्षणिक वर्ष हे जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होईल. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी खारघरमध्ये झालेल्या दुर्घटनेत उष्माघातामुळे १४ जणांचा मृत्यू झाला. राज्य सरकारने या घटनेची गंभीरतेनं दखल घेतली आहे. त्यामुळेच, आता उन्हाळी सुट्टी याच महिन्यात जाहीर केली जाईल. कदाचित आजपासूनच उन्हाळी सुट्टी देण्यात येईल, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. 

दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना, खारघर येथील घटनेचा उल्लेख केला. खारघर घटनेचे कुणीही राजकारण करू नये. यंदाचा उन्हाळा वेगळा आहे, कोकणात कधी तीव्रता जाणवत नसते, पण यंदा कोकणातही उन्हाळ्याची तीव्रता जाणवत आहेत. त्यामुळेच, २ मेपासून शाळांना सुट्ट्या जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, त्याऐवजी कदाचित आजपासूनच शाळांना सुट्टी जाहीर केली जाईल. मी शाळांकडून अहवाल मागवले आहेत, शाळांची परीक्षाची कामे झाली असतील तर आजपासूनच मी उन्हाळी सुट्टी जाहीर करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलं. तसेच, पालकांनी मुलांची काळजी घ्यावी, उन्हाळी सुट्टीतही मुलांना उन्हात खेळायला पाठवू नये, असेही त्यांनी म्हटले.  

दरम्यान, इयत्ता पहिली ते नववी आणि इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शाळांना ३० एप्रिल रोजी किंवा त्यानंतर उन्हाळी सुट्टीच्या काळात जाहीर करता येणार आहे. हा निकाल संबंधित विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही शाळांची असणार आहे. शाळातून उन्हाळी किंवा दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून नाताळ किंवा गणेशोत्सव दरम्यान समायोजन करण्याचे अधिकार शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगीने देण्यात येणार आहे.  

टॅग्स :शाळाशिक्षणदीपक केसरकर समर स्पेशल