... म्हणून शरद पवार अन् माझी ईडी चौकशी, जाणून घ्या 'राज' की बात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 03:16 PM2019-09-30T15:16:43+5:302019-09-30T15:43:41+5:30

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता राज्यातील राजकीय वातावरण तापवलं होतं.

... So Sharad Pawar and me ED inquiry, told 'Raj' thackarey in MNS rally in mumbai | ... म्हणून शरद पवार अन् माझी ईडी चौकशी, जाणून घ्या 'राज' की बात

... म्हणून शरद पवार अन् माझी ईडी चौकशी, जाणून घ्या 'राज' की बात

googlenewsNext

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. यावेळी मनसे कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी, विधानसभा निवडणुकीच्या जागांबाबत योग्य वेळी घोषणा करणार असल्याचंही राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. 5 तारखेला राज ठाकरेंची पहिली प्रचारसभा होणार असून, त्यानंतर मनसेच्या प्रचाराचा धडाका सुरू होणार आहे. तसेच, त्यांच्या आणि पवारांच्या पाठीमागे ईडीची चौकशी लावण्याचे कारणही राज यांनी सांगितले. 

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता राज्यातील राजकीय वातावरण तापवलं होतं. आता विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं पुन्हा एकदा राज यांची ठाकरी तोफ धडाडणार आहे. मध्यंतरी मनसे काँग्रेस आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवेल अशी चर्चा रंगली होती; परंतु काँग्रेसकडून मनसेला सोबत घेण्याबाबत सकारात्मकता न दर्शविल्याने ही चर्चा मागे पडली. तत्पूर्वी राज ठाकरेंना ईडी चौकशीला सामोरे जावे लागले होते. राज यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्यावरही ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुद्द शरद पवार यांनीच ईडी कार्यालयात चौकशीला जात असल्याचे पवार यांनी म्हटले होते. मात्र, ईडीनेच तुर्तास चौकशीला येण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. 

राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या ईडी चौकशीचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजला. यावरुन दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी भाजपा सरकारचा विरोध केला. भाजपा सरकार सूडबुद्धीचं राजकारण करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मात्र, राज ठाकरे याबाबत काहीही बोलले नव्हते. आज मनसेच्या मेळाव्यादरम्यान राज यांनी ईडीच्या चौकशीबाबत खुलासा केला आहे. ''माझी आणि पवार कटुंबियांमागे ED चौकशी लावण्यामागे निवडणुकीत आपल्याला कुणी आर्थिक मदत करू नये हा उद्देश आहे. ईडीची चौकशी किंवा अन्य प्रकरणात चौकशी मागे लागल्यास उद्योगपती, देणगीदार त्यापक्षाशी संपर्क टाळतात. फोनही घेत नाहीत. त्यामुळे पक्षाला आर्थिक मदत मिळत नाही”, असं स्पष्टीकरण राज यांनी दिलंय. 

दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत यश मिळेल, असं मला वाटतंय. माझा आतला आवाज मला सांगतोय, यश नक्की मिळणार, असे म्हणत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्याचा प्रयत्न राज यांनी केला आहे. 
 

Web Title: ... So Sharad Pawar and me ED inquiry, told 'Raj' thackarey in MNS rally in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.