... म्हणून लोकसभा पोटनिवडणुकीतील विजयानंतर पवारांचा सातारा दौरा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 10:24 AM2019-10-26T10:24:30+5:302019-10-26T10:27:24+5:30
लोकसभा निवडणुकीत यंदा उदयनराजेंचे मताधिक्य गेल्या वेळेपेक्षा निम्म्याने घटले होते.
मुंबई - अवघ्या चार महिन्यांत राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेल्या उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जोरदार लढत दिली आणि साताऱ्याची जागा खेचून आणली. उदयनराजेंचा लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये 87,717 एवढ्या मोठ्या फरकाने पराभव झाला. सातारालोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी विजय मिळवला. या विजयाचा शरद पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा आनंद झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत यंदा उदयनराजेंचे मताधिक्य गेल्या वेळेपेक्षा निम्म्याने घटले होते. मात्र, भाजपातून पोटनिवडणूक लढविताना त्यांना धक्कादायक पराभव पहावा लागला. खरेतर सातारा ही छत्रपतींची राजगादी. येथे उदयनराजे प्रचंड मताधिक्याने निवडून येत होते. राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी नुकताच भाजप प्रवेश केला होता. लोकसभेच्या सर्वसाधारण निवडणुकीत त्यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार दिला होता. माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी लढत दिली होती. मात्र, उदयनराजे भाजपात गेल्याने शिवसेनेने पोटनिवडणुकीपुरती सीट सोडल्याचे सांगितले होते.
साताऱ्यातील पोटनिवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यात, पवारांची मोठी रॅली आणि पावसातील सभा महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरली. त्यामुळे साताऱ्यातील राष्ट्रवादीचा विजय सोपा झाला. शरद पवारांचे मित्र असलेल्या श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला. त्यानंतर, शरद पवारांनी उद्याच मी साताऱ्याला जाऊन तेथील जनतेचे आभार मानणार असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळेंनीही याबाबत माहिती दिली होती. पवार विजयादिवशीचा साताऱ्याला जाणार होते, पण काही कारणास्तव दुसऱ्या दिवशी जाणार असल्याचं सांगितलं. मात्र, पुन्हा दुसऱ्यादिवशीही पवारांनी सातारा दौरा रद्द केला. याउलट खासदार श्रीनिवास पाटीलच बारामती येथे पवारांच्या भेटीला आले.
शरद पवारांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे श्रीनिवास पाटील यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे नियोजन साताऱ्यात करण्यात आले होते. मात्र, तेथील राजकीय परिस्थितीमुळे श्रीनिवास पाटीलच बारामतीत आहे. त्यामुळे पवारांचा सातारा दौरा रद्द झाला आणि सत्कारसोहळा बारामतीतच पार पडला.
हा कार्यक्रम खरं तर साताऱ्यातच करण्याचे योजले होते, परंतु तेथील राजकीय परिस्थितीमुळे श्रीनिवास बारामतीत आले आणि हा हृद्य सोहळा संपन्न झाला.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 25, 2019