अंनिसने सांगितले कारण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपल्या घामातील सिबम द्रव्याचे रेणू आणि वस्तूच्या पृष्ठभागावरचे रेणू यांच्यातील विषमाकर्षण बलामुळे वस्तू अंगाला चिकटते, अशी माहिती छद्म विज्ञानाचे अभ्यासक प.रा. आर्डे यांनी दिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ‘चुंबक मानव : चमत्कार की छद्म विज्ञान’ या विषयावर आयोजित ऑनलाइन व्याख्यानादरम्यान त्यांनी ही माहिती दिली.
प्रा. आर्डे म्हणाले, “चुंबकशक्तीने वस्तू तोलून धरल्या जात नसतील, तर अशा वस्तू शरीराला चिकटण्याचे कारण काय? तर याचे कारण आहे, आपल्या घामातील सिबम नावाचे एक द्रव्य. द्रव्याचे रेणू आणि जी वस्तू तोलून धरायची तिच्या पृष्ठभागावरचे रेणू विषमाकर्षण बलामुळे एकमेकांत गुंततात आणि त्यातून एक प्रकारचा चिकटपणा निर्माण होतो. या चिकटपणातून निर्माण झालेले घर्षण गुरुत्वाकर्षणाला बॅलन्स करते आणि तो पदार्थ तोलला जातो, चिकटला जातो. घर्षणामुळे आणि घामातील चिकट द्रव्यामुळे हे घडते. हे सिद्ध करण्यासाठी प्रख्यात अमेरिकन जादूगार जेम्स रँडीने एक प्रयोग केला. चुंबक मॅन असण्याचा दावा करणाऱ्या एका गृहस्थाच्या छातीवर त्याने टाल्कम पावडर चोळली. या पावडरीमुळे घामट द्रव्याचा परिणाम नाहीसा झाला आणि वस्तू तोलली गेली नाही.
ज्याचे शरीर गुळगुळीत आहे, ज्याच्या अंगावर केस नाहीत व त्वचा रबरासारखी इलॅस्टिक आहे, अशी कोणतीही व्यक्ती धातूच्या वस्तू आपल्या अंगावर तोलून धरू शकतात. कोरोना प्रतिबंधक लसीमुळे शरीरात चुंबकत्व येते याला काहीही शास्त्रीय आधार नाही, उलट अशा अफवेमुळे लसीकरण मोहिमेला खीळ बसेल, लोकांच्या मनात अशा अफवेमुळे लसीबाबत गैरसमज पसरतील, त्यामुळे शासनाने असे फसवे दावे करणाऱ्यांवर साथ प्रतिबंध कायदा व जादूटोणाविरोधी कायद्याचा वापर करून गुन्हे नोंद करावेत, असे ते म्हणाले.
कोरोना लसीमुळे आपल्या अंगात चुंबकीय शक्ती आली आहे, असा दावा करणाऱ्या गृहस्थापासून ते अनेक ठिकाणी स्वत: ‘चुंबक मॅन’ असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तींचे पीक महाराष्ट्रात जोमात वाढू लागले आहे. कोरोना लसीमुळे आपल्यात चुंबकत्व आले, असा दावा ही मंडळी करीत आहेत. मात्र, चिकित्सेअंती चुंबक मॅन म्हणून मिरविणाऱ्या व्यक्ती चुंबकीय शक्ती नसून अन्य कारणांनी त्या व्यक्तीच्या अंगाला धातूच्या वस्तू चिकटतात, असे सिद्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.