अकरावीतील गुणांचा अंतर्भाव अडचणीचा; बारावीचा फॉर्म्युला मंगळवारपर्यंत जाहीर हाेण्याची शक्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सीबीएसई बारावी निकालाच्या सूत्रानंतर पुढील आठवड्यात म्हणजे येत्या सोमवार, मंगळावरपर्यंत राज्य मंडळाकडून बारावी निकालासाठी मूल्यमापन धोरण जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्य मंडळाच्या बारावी निकालासाठी असलेले मूल्यमापनाचे सूत्र सीबीएसईच्या धोरणावर आधारित असले तरी त्यापेक्षा थोडे वेगळे असेल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली. दरम्यान, सीबीएसईप्रमाणे राज्य शिक्षण मंडळानेही अकरावीच्या गुणांना ३० टक्के वेटेज दिल्यास अंतिम गुणांकनात घसरण होण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे.
२०१९-२० या वर्षात उशिरा सुरू झालेली अकरावीची प्रवेश प्रक्रिया आणि उरलेल्या काही महिन्यांत पूर्ण न झालेला अभ्यासक्रम यामुळे विद्यार्थ्यांनी स्वाध्याय, गृहपाठ, चाचण्या यांच्याकडे लक्ष न दिल्याने ते रेस्ट ईअर म्हणूनच गेल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. अशात अकरावीच्या गुणांचा अंतर्भाव बारावी निकालात होणार असेल, तर निश्चितच निकाल खाली येण्याची भीती त्यांना वाटत आहे.
मूल्यमापन पद्धतीच्या पर्यायांचा विचार करायचा झाल्यास निकाल जाहीर करताना अकरावीमध्ये मिळालेले ५० टक्के गुण आणि बारावीच्या वर्षातील परीक्षा, गृहपाठ यामध्ये मिळालेले ५० टक्के गुण, असे एकत्र मिळून अंतर्गत मूल्यमापनाची पद्धती असू शकते. या टक्केवारीचे प्रमाण ६०:४० किंवा कमी जास्तही असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सीबीएसईप्रमाणे दहावी, अकरावी, बारावी तिन्ही वर्षांच्या निकालाचा विचारही बारावी निकालासाठी केला जाऊ शकतो. मात्र, यामध्ये दहावी अभ्यासक्रमात बारावीच्या विषयांचा समावेश किंवा अभ्यासक्रम समावेश नसल्याने अडचण ठरू शकते, असे मत काही अभ्यासकांनी मांडले.
काय म्हणतात पालक -विद्यार्थी?
आधीच मूल्यांकन पद्धत जाहीर व्हायला उशीर झाला आहे. त्यात जर रेस्ट ईअर म्हणजे अकरावीच्या गुणांचा समावेश असेल, तर विद्यार्थ्यांची बारावीची टक्केवारी घसरेल. त्यामुळे प्रात्यक्षिक, यंदाच्या चाचण्या यावर शिक्षण मंडळाने मूल्यांकनासाठी अधिक भर द्यावा
-सुवर्णा कळंबे, पालक
अनेक जण पारंपरिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार आहेत, तर आमच्यासारखे अनेक जण सीईटी देऊन प्रवेश घेणार आहेत. आमच्यासाठी हे गुण महत्त्वाचे असले तरी सीईटी गुणांवरून आमच्या प्रवेशाची चढाओढ असेल. पारंपरिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयात प्रवेशासाठी या गुणांचा आधार घेतला जाईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून मूल्यांकनाची पद्धत ठरवावी, ही अपेक्षा आहे.
-श्रुती नाईक, विद्यार्थीनी, बारावी
दहावीचे गुणही ग्राह्य धरायला हवेत
अनेक कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावीच्या परीक्षा झालेल्या नाहीत, तसेच अनेक महाविद्यालयांत बारावीच्या पूर्वपरीक्षाही घेता आलेल्या नाहीत. त्यामुळे केवळ अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे बारावीचा अंतिम निकाल जाहीर करणे योग्य ठरणार नाही. उलट दहावीच्या परीक्षेचे मूल्यांकन पारदर्शी आणि गुणवत्तेला धरून असते. त्यामुळे या अपवादात्मक परिस्थितीत सीबीएसईप्रमाणे या विद्यार्थ्यांचे दहावीचे गुणही ग्राह्य धरायला हवेत.
-मुकुंद आंधळकर,
समन्वयक, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ
................................................