Video : ... म्हणून 60 पेक्षा कमी वय असतानाही सुप्रिया सुळेंनी घेतली कोरोनाची लस
By महेश गलांडे | Published: March 1, 2021 04:11 PM2021-03-01T16:11:29+5:302021-03-01T16:14:29+5:30
देशभरात आजपासून ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस टोचून घेण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत आज सकाळीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लस टोचून घेतली.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुंबईत जे.जे. रुग्णालयात कोरोनाची लस (Corona Vaccine) टोचून घेतली आहे. शरद पवार यांच्यासोबत त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कोरोनाची लस घेतली. जे.जे.रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह काही डॉक्टर पवारांसोबत उपस्थित होते. (ncp chief sharad pawar takes covid vaccine in mumbai j.j.hospital). सुप्रिया सुळे यांनी लस घेतल्यानंतर जनतेलाही लस टोचून घेण्याचं आवाहन केलंय.
देशभरात आजपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस टोचून घेण्याच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत आज सकाळीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लस टोचून घेतली. त्यानंतर आता शरद पवार यांनीही पुढाकार घेऊन मुंबईत जे.जे.रुग्णालयात कोरोना लस घेण्यासाठी उपस्थिती लावली आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पवार यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यानंतर पवारांना 'सीरम'ची 'कोव्हिशिल्ड' लस टोचण्यात आली. त्यानंतर, खासदार सुप्रिया सुळेंनीही कोरोनाची लस घेतली. मात्र, सुप्रिया सुळे यांचं वय 60 नसताही त्यांना कोरोनाची लस कशामुळे देण्यात आली असा प्रश्न सोशल चर्चेला आला. त्यावेळी, सुप्रिया सुळे यांना शुगर आणि उच्च रक्तदाब असल्याने त्यांनाही कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांकडून मिळाली.
जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे जाऊन कोरोनाची लस घेतली. रुग्णालयाच्या कर्मचारी श्रद्धा मोरे यांनी ही लस दिली. सरकारने आजपासून (१ मार्च) तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात केली आहे.आपणही नोंदणी करुन लस अवश्य टोचून घ्यावी ही विनंती. #vaccinationpic.twitter.com/wBgOolyxlg
— Supriya Sule (@supriya_sule) March 1, 2021
जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे जाऊन कोरोनाची लस घेतली. रुग्णालयाच्या कर्मचारी श्रद्धा मोरे यांनी ही लस दिली. सरकारने आजपासून (१ मार्च) तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणास सुरुवात केली आहे.आपणही नोंदणी करुन लस अवश्य टोचून घ्यावी ही विनंती, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलंय.
कोरोनाची लस घेणारे महाराष्ट्रातील पहिले नेते
कोरोना प्रतिबंधक लस घेणारे शरद पवार हे महाराष्ट्रातील पहिले राजकीय नेते ठरले आहेत. देशात आजपासून ६० वर्षांवरील आणि गंभीर आजारांशी लढा देणाऱ्या ४५ वर्षांवरील वयोगटातील लोकांना कोरोनाची लस दिली जात आहे. त्यामुळे, सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लस देण्यात आली असून कोरोनाची लस घेणाऱ्या त्या पहिल्या महिला नेत्या ठरल्या आहेत.