मनोहर कुंभेजकर, मुंबई: राज्यात सत्ता असलेल्या सरकारमध्ये सामील होत आणि शिंदे गटात गेलेल्या आमदारांनी घटनेच्या शेड्युल्ड 10चे उल्लंघन केले आहे.विधानसभा अध्यक्षांच्या समोर सुरू असलेल्या लवादाबद्धल सदसद विवेक बुद्धीला स्मरून त्यांनी निर्णय दिला तर त्या 16 आमदारांचे निलंबन अटळ आहे असे ठाम प्रतिपादन शिवसेना नेते,आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांनी लोकमत कडे व्यक्त केले. युवासेनाप्रमुख,आमदार आदित्य ठाकरे वारंवार सांगतात की, हे सरकार ३१ डिसेंबर पूर्वी कोसळू शकते असेही ते म्हणाले.
ज्या पद्धतीने मूळ शिवसेना फोडून आणि शिवसेनेचे नाव व चिन्ह चोरण्याचे काम भाजपाने केले असल्याने राज्यातील जनतेमध्ये चीड असून शिवसेनेबद्धल जनतेच्या मनात प्रचंड सहानभूती आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात जे महाराष्ट्रात काम केले,त्यामुळे सर्व जाती धर्माचे नागरिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच आहे.महाविकास आघाडीची वर्जमुठ भक्कम असल्याने प्रस्थापितांचा पराभव अटळ असल्याचे प्रभू यांनी ठामपणे सांगितले.
सुनील प्रभू यांची नुकतीच त्यांच्या गोरेगाव (पूर्व ),आरे चेक नाक्या लगत असलेल्या त्यांच्या कार्यालयात भेट घेतली असता त्यांनी सध्याची राजकीय स्थिती,ईव्हीम मशीन,आगामी निवडणुकांबद्धल त्यांची भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली.मुंबई सह महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि नंतर होणाऱ्या विधानसभा आणि महानगर पालिकांच्या निवडणुकांचे चित्र शिवसेनेसाठी पोषक असेल.ज्या पध्दतीने विद्यमान सरकार खोटी आश्वासने देवून कष्टकरी, शेतकरी,कामगार,उद्योग क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र,आरोग्य क्षेत्र या सगळ्यात वल्गना करून राज्यातील जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ईव्हीएम मशीन खरे की खोटे आहे याबद्धल नागरिकांच्या मनात संभ्रम असून याबद्धल वेगवेगळ्या चर्चा होत आहे. त्यामुळे लोकमत काय आहे याबद्धल एकदा बँलेट पेपरवर निवडणुका घेण्याचे धारिष्ट निवडणणुक आयोगाने दाखवल्यास दूध का दूध आणि पाणी का पाणी समजून येईल अशी भूमिका त्यांनी मांडली.