मुंबई - भारतात २०२४ मध्ये जे होईल ते केवळ सत्तांतर नव्हे तर मूल्यांतर असेल. त्यासाठी संविधानाच्या धाग्याने सर्व समविचारींनी एकत्र यावे, अन्यथा फुटीरपणा हाच ‘इंडिया’च्या पराभवाचा जाहीरनामा असेल, असे खडे बोल संवेदनशील कवी, साक्षेपी विचारवंत म्हणूनच नव्हे तर भूमिकानिष्ठ कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या डॉ. यशवंत मनोहर यांनी देशपातळीवरील ‘इंडिया’ आघाडीला सुनावले.
यशवंतराव चव्हाण केंद्राच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३’ डॉ. मनोहर यांना केंद्राचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी मनोहर यांनी रोखठोक भूमिका मांडली. दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असे यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीदिनी दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी ॲड. विजित शेट्टी यांना न्यायमूर्ती वाय.व्ही. चंद्रचूड यांच्या नावाचे पारितोषिक देण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम परीक्षेत प्रथम येणाऱ्याला या पुरस्काराने गौरविण्यात येते. आताही समाजातील समता, सभ्यता यांना बाधित करणारे खडे, केरकचरा बाजूला करणे, या साहित्यिकाच्या जबाबदारीचे भान त्यांनी पुरस्कार स्वीकारताना करून दिले. व्यक्तीवर प्रहार करण्याऐवजी विषमतेच्या, शोषणसत्ताकाच्या तत्त्वज्ञानावर प्रहार करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व धर्मनिरपेक्षवादी आमचे हिंदुत्व कुठल्याही धर्माचा तिरस्कार करणारे नव्हे तर सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे आहे, असे उद्धव ठाकरे नेहमी म्हणतात. हे मला पटते. कारण हे विचार धर्मनिरपेक्षतेची भूमिका मांडणारे आहे.- डॉ. यशवंत मनोहर, ज्येष्ठ साहित्यिक
सौम्या स्वामिनाथन यांना पुरस्कार जाहीरदरवर्षी राष्ट्रीय पातळीवर महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तीला केंद्राच्या वतीने ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ देण्यात येतो. संशोधक डाॅ. सौम्या स्वामिनाथन यांना जाहीर झाल्याची घाेषणा पुरस्कार निवड समितीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल काकोडकर यांनी केली.
‘प्रकाशां’ना वेचासंघ आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असेल तर सर्व बहुजनांनी एकत्र येऊन समविचाराचे ‘प्रकाश’ एकत्र घ्यावे, अन्यथा हिंदू राष्ट्र मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे नाव घेत डॉ. मनोहर यांनी दिला. शरद पवार यांनी मनुवादाशी संघर्ष करण्यासाठी समविचारींना एकत्र घेऊन इंडियाला मजबूत करणे आवश्यक आहे. त्यासाठी जमेल ते कष्ट करू, असे आश्वासन त्यांनी दिले. हेमंत टकले यांनी मानपत्राचे वाचन केले.