... तर बिल्डरांना रेराचा फास; ठरलेल्या करारानुसारच घर विकावे लागणार, अन्यथा प्रकल्प होणार रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 05:43 AM2022-12-17T05:43:52+5:302022-12-17T05:44:04+5:30
घर खरेदीदार अणि विकासक यांच्यातील घर विक्रीकरार ठरवून दिलेल्या मसुद्यानुसारच होणे अपेक्षित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घर खरेदीदार अणि विकासक यांच्यातील घर विक्रीकरार महारेराच्या मसुद्यानुसारच होणे आवश्यक असून त्यात दैवी आपत्ती, चटई क्षेत्र, दोषदायित्व कालावधी आणि हस्तांतरण करार हे मुद्दे नसतील तर प्रकल्प रद्द होणार आहे. घर खरेदीदाराचे हित जपले जावे यासाठी महारेराने या बाबी स्पष्ट केल्या असून, याबाबत तडजोड केली जाणार नाही, असे महारेराने स्पष्ट केले आहे.
घर खरेदीदार अणि विकासक यांच्यातील घर विक्रीकरार ठरवून दिलेल्या मसुद्यानुसारच होणे अपेक्षित आहे. मात्र, ग्राहकांकडून प्राप्त होत असलेल्या तक्रारींनुसार करारात मसुद्यातील कलमांऐवजी वेगळ्या स्वरूपाची कलमे समाविष्ट केल्याचे आढळते. त्यामुळे विक्रीकरारांमध्ये दैवी आपत्ती, चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी आणि हस्तांतरण करार या विक्री करारातील ४ तरतुदींबाबत तडजोड केली जाणार नाही, असे महारेराने स्पष्ट केले आहे. इतर बाबतीत खरेदीदारांच्या सहमतीने बदल केले जाऊ शकतात. मात्र, खरेदीदाराला ते बदल ठळकपणे कळण्यासाठी ते अधोरेखित करणे आवश्यक आहे.
जेथे अशा कलमांचे उल्लंघन होत असेल तेथे महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांच्या नोंदणीचे अर्ज सरसकट नाकारणार आहे.
बदल करण्याची परवानगी
विकासकास प्रत्येक प्रकरणातील तथ्ये आणि परिस्थितीच्या आधारे कराराच्या मसुद्यामध्ये बदल करण्याची परवानगी आहे. मात्र, रेरातील तरतुदी अनिवार्य आहेत. विकासक आणि घर खरेदीदारांतील करारामध्ये त्या कायम ठेवल्याच पाहिजेत.
करारात
काय हवे?
विक्रीकरार रेरा कायद्यातील तरतुदींशी सुसंगत असावा.
विकासकांना नोंदणीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे.