"... म्हणून पोलिसांनी दीपक केसरकरांना ताब्यात घेऊन कारवाई केली पाहिजे"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 07:28 PM2023-06-21T19:28:54+5:302023-06-21T19:29:49+5:30
राज्यातील सत्तासंघर्षाच्या वादात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे.
मुंबई - राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी धक्कादायक विधान केलं आहे. 'आमदारांनी केलेला उठाव यशस्वी झाला नसता, तर एकनाथ शिंदे यांनी गोळी झाडून घेतली असती', असा खळबळजनक दावा केसरकर यांनी केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रोजच पाहायला मिळत आहे. त्यामुळे, केसरकरांच्या या विधानावर शिवसेना ठाकरे गटाची प्रतिक्रिया स्वाभाविकच आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना दीपक केसरकरांना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या वादात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड करुन शिवसेनेतील वेगळा गट तयार केला. या गटाने शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडून पक्ष आणि चिन्ह दोन्हीही मिळवले आहे. त्यामुळे, शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटातील वाद टोकाला पोहोचला आहे. एकनाथ शिंदेंचं हे बंड यशस्वी झाल्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्याच, अनुषंगाने मंत्री दीपक केसरकर यांनी धक्कादायक विधान केलं आहे. जर आमदारांनी केलेला उठाव यशस्वी झाला नसता तर एकनाथ शिंदेंनी गोळी झाडून घेतली असती, असे दीपक केसरकर यांनी म्हटलंय. त्यावर, आता संजय राऊत यांनी भाष्य केलंय.
'बापरे, खरं म्हणजे त्याबद्दल पोलिसांनी दीपक केसरकरांना ताबडतोब ताब्यात घेतलं पाहिजे. कारण एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार घोळतो आहे आणि ते केसरकरांना माहिती आहे.', असे म्हणत संजय राऊत यांनी दीपक केसरकर यांच्या दाव्यावर पलटवार केला. तसेच, 'उद्या विधानसभा अध्यक्षांनी घटनेला स्मरून काही निकाल दिला तर एकनाथ शिंदे आत्महत्या करू शकतात. त्यामुळे पोलिसांनी दीपक केसरकरांना ताबडतोब ताब्यात घेऊन कारवाई केली पाहिजे,' अशी मागणी संजय राऊतांनी केली.