दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा... असे म्हटले जाते. फटाके आणि दिवाळी हे समीकरण कैक वर्षांपासून दृढ आहे. फटाक्यांमध्येही आवाज करणारे, रोषणाईचे, डोळे दीपवून टाकणारे वगैरे असे असंख्य प्रकार असतात. अख्खी इंडस्ट्रीच असते ती. वर्षभर या फटाक्यांची निर्मिती सुरू असते. दिवाळीत मात्र चाळीचाळींत, गल्लोगल्ली, टॉवरटॉवरांत फटाके फोडले जातात. शहरात त्याचे प्रमाण जरा जास्त असते. फटाके फोडल्याचे समाधान दिवाळसणात मिळते. मात्र, फोडलेल्या फटाक्यांचा धूर आसमंत व्यापतो तेव्हा त्याचे परिणाम जाणवू लागतात. अनेकांचा श्वास कोंडतो, जीव गुदमरतो. काही जण तर थेट या दीपोत्सवाच्या काळात शहरापासून दूर एकांतात जाणेच पसंत करतात. त्याचे एकमेव कारण म्हणजे फटाक्यांच्या धुरामुळे होणारी श्वासकोंडी... मुंबईत त्याचे प्रमाण अंमळ जास्त असते.
गेल्या काही वर्षांत मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा त्रास जाणवत आहे. काही महिन्यांपूर्वी मुंबईतील प्रदूषणाची पातळी वाढली होती. सद्यःस्थितीत शहरात अनेक पायाभूत प्रकल्पांची कामे सुरू आहेत. भरीस भर म्हणजे गंगनचुंबी इमारतींचे बांधकामही त्याबरोबरीने सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य शहरावर आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाले आहे. मुंबई महापालिकेने याची गंभीर दखल घेऊन काही उपाय योजना सुचविल्या होत्या.
दिवाळीमध्ये शहरात सर्वच ठिकाणी फटाके मोठ्या प्रमाणात वाजविले जातात. या फटाक्यांमधून जीव घुसमटून टाकणारे वायू मुंबईच्या आकाशात मिसळतात. त्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होते. तसेच ध्वनी प्रदूषणातही वाढ होत असते. त्यामुळे ज्या रुग्णांना श्वसनाचे विकार आहेत. हृदयविकार, अर्धांगवायू, कान, नाक, घसा यांचे विकार आहेत. त्यांना या काळात आरोग्याच्या दृष्टीने खूप त्रास होत असतो. त्यामुळे सणाच्या दिवशी तक्रारी आणि वाद करण्यापेक्षा अनेक जण काही दिवसांसाठी शहराबाहेर जाणे पसंत करतात. त्यासोबत दिवाळीत फटाक्याच्या रूपाने निर्माण होणाऱ्या घातक वायूचा आणि आवाजाचा परिणाम ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना होतो.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, फटाक्यांच्या धुरामधून विषारी वायू हवेत मिसळतात. ही हवा फुफ्फुसावाटे शरीरात गेल्याने श्वसनविकार असलेल्या रुग्णांना छातीत जळजळणे, खोकला येणे, श्वास घेण्याचा त्रास होण्याच्या समस्या उदभवतात. हौसिंग सोसायट्यांमध्ये फटाके लावल्याने त्याचा आवाज घुमतो आणि त्याचा रुग्णांना त्रास होतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची चिडचिड होते. काहींना छातीत धडधड होण्यास सुरुवात होते. या काळात अनेकांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे नाडीचे ठोके वाढतात. ज्यामुळे रुग्णांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे या काळात ज्यांना शहराबाहेर जाणे शक्य आहे ते निघून जातात. काही रुग्ण खिडक्या दरवाजे लावून घरातच बसतात. हवेतील प्रदूषण टाळण्यासाठी काहीवेळा मास्क लावणे फायद्याचे ठरू शकते.