... तर ही गंभीर बाब आहे; PM मोदींच्या व्हायरल व्हिडिओवर राष्ट्रवादीचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 11:47 PM2023-01-27T23:47:07+5:302023-01-27T23:47:19+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. त्या, व्हिडिओवरुन राष्ट्रवादीने प्रश्न उपस्थित केला आहे.
मुंबई/नवी दिल्ली - देशभरात मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजधानी दिल्लीतील राजपथावर तिरंग्याला सलामी दिली. राजपथावर सैन्य दलाच्या कसरती, परेड आणि दैपिप्यमान सोहळा पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत देशभक्तीचं वातावरण पाहायला मिळालं. महाराष्ट्रातही गावच्या पंचायतपासून ते मंत्रालयापर्यंत तिरंगा ध्वजाला सलामी देण्यात आली. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. त्या, व्हिडिओवरुन राष्ट्रवादीने प्रश्न उपस्थित केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राजपथावर आल्यानंतर प्रमुख पाहुण्यांशी हस्तांदोलन करुन शुभेच्छा देताना दिसून येतात. मात्र, या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यापाठीमागे राष्ट्रपती दिसून येतात. प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपती पद हे देशातील सर्वोच्च पद असल्याने राष्ट्रपती सर्वात पुढे असायला हव्यात. त्यानंतर, पंतप्रधान. मात्र, या व्हिडिओत पंतप्रधान मोदी सर्वात पुढे दिसत असल्याने अनेकांनी आक्षेप घेतला आहे. दरम्यान, हा व्हिडिओ खरा की खोटा याची खात्री झालेली नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ खरा असेल तर ही गंभीर बाब आहे. राष्ट्रपती हे सर्वोच्च संविधानिक पद आहे. देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती, दुसरे उपराष्ट्रपती आणि तिसरे पंतप्रधान असतात. देशाच्या पंतप्रधानांकडूनच हा प्रोटोकॉल पाळला जात नसल्यास तो राष्ट्रपतीपदाचा अपमान ठरेल, अशा शब्दात राष्ट्रवादीच्या ट्विटर हँडलवरुन व्हायरल व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ खरा असेल तर ही गंभीर बाब आहे. राष्ट्रपती हे सर्वोच्च संविधानिक पद आहे. देशाचे प्रथम नागरिक राष्ट्रपती, दुसरे उपराष्ट्रपती आणि तिसरे पंतप्रधान असतात. देशाच्या पंतप्रधानांकडूनच हा प्रोटोकॉल पाळला जात नसल्यास तो राष्ट्रपतीपदाचा अपमान ठरेल. pic.twitter.com/rrCCuXaCX3
— NCP (@NCPspeaks) January 27, 2023
दरम्यान, आता राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटरवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आल्याने या व्हिडिओची सत्यता आणि खरंच असं घडलंय का याचा खुलासा भाजपकडून होईल, हे पाहावे लागेल.