... त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार, फडणवीसांकडून मोदींचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 05:34 PM2021-04-25T17:34:18+5:302021-04-25T17:35:19+5:30

महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अतिशय आभारी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

... so thousands of oxygen beds will be available, thanks to Modi from Fadnavis | ... त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार, फडणवीसांकडून मोदींचे आभार

... त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार, फडणवीसांकडून मोदींचे आभार

Next
ठळक मुद्देबीपीसीएलचे संचालक अरुणसिंग यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी राज्य सरकारने कम्प्रेसरची व्यवस्था केल्यास ऑक्सिजन सिलेंडर्स भरून देण्याची सुद्धा तयारी दर्शविली आहे.

मुंबई - संपूर्ण देशभरात दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाचे संकट गहिरे होत असताना रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात चणचण भासू लागली आहे. परिणामी कोरोनाबाधिता रूग्णांचे हाल सुरू आहेत. तर ऑक्सिजनअभावी काही रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील ठाकरे सरकार विविध उपाययोजना करत आहे. त्यासोबतच, रुग्णांना ऑक्सिजन बेड आणि रेमडीसीवीर इंजेक्शनसाठीही भटकंती करावी लागत आहे. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने रुग्णालयाबाहेरच रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, आता केंद्र सरकारने परवानगी दिल्यामुळे मुंबईत जम्बो कोविड सेंटर उभारणार आहे. 

महाराष्ट्र सरकारची विनंती तत्काळ मान्य करीत मुंबई येथील भारत पेट्रोलियमच्या रिफायनरी परिसरात जम्बो कोविड सेंटरसाठी परवानगी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अतिशय आभारी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या जम्बो कोविड सेंटरला अखंडित ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी बीपीसीएलने तयारी दर्शविली आहे. त्यामुळे हजारो ऑक्सिजन बेडस येथे उपलब्ध होऊन कोरोनाच्या रुग्णांवर उपचार होऊ शकतील, असे म्हणत फडणवीस यांनी मोदींचे आभार मानले आहेत. 

बीपीसीएलचे संचालक अरुणसिंग यांच्याशी दूरध्वनीवर झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी राज्य सरकारने कम्प्रेसरची व्यवस्था केल्यास ऑक्सिजन सिलेंडर्स भरून देण्याची सुद्धा तयारी दर्शविली आहे. त्यामुळे सुद्धा मोठा दिलासा महाराष्ट्राला मिळेल, असेही फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑक्सिजन बेडची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे, रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. त्यातच, ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावल्याच्याही अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. त्यामुळे, हे जम्बो कोविड सेंटर रुग्णांसाठी लाभदायक ठरेल. 

केंद्र सरकारकडून ऑक्सिजनही मिळणार 

ऑक्सिजनचा तुटवडा भरून निघण्यासाठी केंद्राला साकडे घातले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना केलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला करण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तपशील मांडणारे दोन फोटो शेअर केले आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अनेकानेक आभार. महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

केंद्रातील मोदी सरकारकडून महत्वाचा निर्णय

देशभरात जिल्हा मुख्यालय स्तरावर ५५१ वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी पीएम केअर्स फंडातून निधी उपलब्ध केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत. 

Web Title: ... so thousands of oxygen beds will be available, thanks to Modi from Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.