मुंबई - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा (BJP) खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) हे मुंबईत 'कृष्णकुंज'वर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्या भेटीला आले होते. उदयनराजेंच्या राजभेटीनंतर सोशल मीडियात आणि राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या. मात्र, मनसेकडून या भेटीसंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलंय. मनसेच्या ट्विटर अकाऊंटवरुन कृष्णकुंजवरील भेटीचे फोटोही शेअर करण्यात आले आहेत.
उदयनराजे भोसलेंनी गेल्या काही दिवसांपासून अनेक नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. याआधीही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचीही भेट घेतली होती. या भेटीदरम्यान मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसेच, राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fhadnavis) यांनाही उदयनराजे मराठा आरक्षणासंदर्भात भेटले होते. त्यानंतर आज सायंकाळी 6.00 वाजता उदयनराजेंनी राज ठाकरेंची भेट घेतली.
दरम्यान, उदयनराजे यांची कृष्णकुंजवर पहिल्यांदाच राज ठाकरे यांच्याशी भेट होत असल्यानं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यात, आज मराठी भाषा दिनाच्या दिवशी ही भेट होत आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणासंदर्भातच ही भेट होत असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, राजभेटीच मनसेनं स्पष्टीकरण दिल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.