Join us

... म्हणून उद्धव ठाकरे बावचळल्यासारखं बोलतायंत, फडणवीसांचा पुन्हा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 7:03 PM

उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदींनी लस तयार केली नसती तर असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले

मुंबई - शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक कलगीतुरा सुरूच आहे. शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे उत्तर देत उद्धव ठाकरेंना अर्धवटराव अशी उपमा दिली होती. त्यानंतर, अर्धवटराव टीकेवरून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला. तर, आता पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय.  

उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदींनी लस तयार केली नसती तर असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस असं बोलतील यावर विश्वास नव्हता. मोदींनीही असे विधान केले नसावे. मी हा व्हिडिओ दाखवला. तो मोर्फ केला असेल तर चौकशी करा. त्यावर त्यांनी मला अर्धवटराव म्हणाले, अर्धवटराव हे पात्र रामदास पाध्येंनी तयार केले. मला अर्धवटराव म्हणत असतील तर फडणवीस दिल्लीश्वरांची आवडाबाई आहे का? आता तेही दिसत नाही ते नावडाबाई झालेत. मोदींनी लस बनवली या वाक्याला अर्थ आहे का? असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या टीकेसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, फडणवीसांनी उद्धव ठाकरे बावचळ्यासारखं बोलत असल्याचं म्हटलं. तसेच, मुंबई महापालिकेतील घोटाळ्याची आता चौकशी होणार असून त्यामुळेच ते असं बोलत आहेत, असेही ते म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. कॅगने आपल्या अहवालात मुंबई महापालिकेत साडे बारा हजार कोटींच्या अनियमिततेचा ठपका ठेवला आहे. उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने मुंबई महापालिकेत जी गँग काम करत होती, ती आता उघडी पडणार आहे, अनेकांचे बुरखे फाटणार आहेत, काहीजण नागडे होणार आहेत. त्यामुळेच, उद्धव ठाकरे असं बावचळल्यासारखं बोलत आहेत, असा पलटवार भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

दरम्यान, शिवसेना १ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार आहे, यासंदर्भात स्वत: उद्धव ठाकरेंनीच पत्रकार परिषदेत माहिती दिली. याबाबत बोलताना, शिवसेनेचा हा मोर्चा काढणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, याशिवाय वेगळं काहीच नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले. 

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसशिवसेनामुंबईमुंबई महानगरपालिका