Join us

... म्हणून आषाढी वारीसाठी वारकरी मंडळींनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 7:46 PM

कोरोनाची दुसरी लाट यंदा खूपच घातक सिद्ध झाली असून आजही गावोगावी कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. शेकडोंनी प्राण गमावले आहेत.

ठळक मुद्देपंढरीच्या आषाढी पायी वारीसाठी ‘बायो-बबल’ पद्धतीचा अवलंब करीत काही निवडक वारकर्‍यांना परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

मुंबई - कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पंढरीची पायी वारी करत न आल्याचं दु:ख वारकऱ्यांना झालं आहे. त्यामुळे, यंदा तरी वारी होणार का नाही, असा सवाल अनेकांना पडलाय. त्यातच, नेहमीप्रमाणे दोन मतप्रवाह पाहायाला मिळत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर वारकरी मंडळाने आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. 

कोरोनाची दुसरी लाट यंदा खूपच घातक सिद्ध झाली असून आजही गावोगावी कोरोनाचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. शेकडोंनी प्राण गमावले आहेत. अशा परिस्थितीत पालखी सोहळ्यातील (Ashadhi Wari) सर्वात शेवटचा मुक्काम असलेल्या वाखरी ग्रामपंचायतीने तर चक्क संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम पालखी सोहळ्यांना पत्र लिहून पायी न येण्याची विनंती केली आहे. मात्र, काही वारकरी मंडळींकडून निमयावली आखून वारी होऊ द्यावी, असा आग्रह धरण्यात येत आहे.  

पंढरीच्या आषाढी पायी वारीसाठी ‘बायो-बबल’ पद्धतीचा अवलंब करीत काही निवडक वारकर्‍यांना परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी वारकरी शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वारीचा कालावधी, संख्येवरील निर्बंधांसह मार्गावरील सर्व गावांचा ठराव असे अनेक प्रस्ताव त्यांनी दिल्याचे फडणवीस यांनी सोशल मीडियातून सांगितले आहे.  

कोविडच्या नियमांचे पालन करतानाच हजारो वर्षांच्या गौरवशाली परंपरेत सुद्धा खंड पडू नये, असा अतिशय व्यवहार्य प्रस्ताव वारकऱ्यांनी दिला आहे. यासंदर्भात मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करेन, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी, विठ्ठल रूख्मिणी मंदिरे समितीचे सदस्य शिवाजी महाराज मोरे, संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, अध्यात्मिक समन्वय आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भाऊ महाराज फुरसुंगीकर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे संजय महाराज धोंडगे, वारकरी संघटनांचे प्रतिनिधी रमेश महाराज वाघ, विकास घांग्रेकर यांच्यासह वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसकोरोना वायरस बातम्यापंढरपूर वारी