Join us

...तर पाणी कपातीची नामुष्की, २५ दिवस पुरेल इतकाच तलावांमध्ये साठा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2023 11:19 AM

मुंबईकरांची चिंता वाढली

मुंबई : मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमधील पाणीसाठा आटू लागला असून, तलावांमध्ये आजघडीला सरासरी सुमारे १२.७६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.  

पुढचे केवळ २५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाची चिंता वाढू लागली आहे. त्यामुळे तलावांतील राखीव कोट्यातील पाण्याचा वापर करुन मुंबईकरांची तहान भागविण्याचा विचार प्रशासन पातळीवर सुरू असून, त्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती मुंबई महापालिकेने राज्य सरकारला केली असली, तरी अद्याप ती मिळालेली नाही. त्यामुळे पाऊस लांबल्यास मुंबईकरांची तहान कशी भागवायची, असा प्रश्न महापालिकेसमोर आहे.  दरम्यान, पुढील महिन्यात पाऊस, तलावांतील जलसाठ्याची स्थिती लक्षात घेऊन पाणी कपातीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. 

नियोजित वेळेत पावसाने हजेरी लावली नाही किंवा पाऊस पडून गायब झाल्यास मुंबईमध्ये पाणी कपात लागू करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवण्याची शक्यता आहे. साधारण मे महिन्यापासून पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने पाऊस पडेपर्यंत पालिकेला पाण्याचे नियोजन करावे लागते. जर पावसाळा लांबला तर पाणी कमी दाबाने सोडले जाते. उन्हाळ्यात तलावातील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने साठा कमी होतो, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

ही परिस्थिती पाहता नागरिकांनी आतापासूनच पाणी बचत करायला सुरूवात करावी असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. जेव्हा तलावातील साठा पुरेसा होईल तेव्हा मुंबईकरांना अधिक प्रमाणात पाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल असे स्पष्टीकरण पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. यामुळे पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागले आहे.नियोजित वेळेत पावसाने हजेरी लावली नाही किंवा पाऊस पडून गायब झाल्यास मुंबईमध्ये पाणी कपात लागू करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवण्याची शक्यता आहे.

राखीव साठ्यावर पालिकेची भिस्ततलावात १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र पाणीसाठा खालावल्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी तलावांतील राखीव पाणीसाठ्याचा वापर पालिकेला करता येतो. 

तलावांतील पाणी साठवणुकीच्या पूर्ण क्षमतेच्या तुलनेत ८ टक्के साठा राखीव असतो. आपत्कालीन परिस्थितीतच राखीव साठ्यातील पाण्याचा वापर करता येतो.

... तर राखीव साठ्याचा वापर होणारसातही तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाल्यानंतर मुंबईकरांना पुढील वर्षभर सुरळीत, पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्य होते. समाधानकारक पावसामुळे १ ऑक्टोबर २०२२ रोजी तलाव काठोकाठ भरले होते. त्यामुळे वर्षभर मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य झाले. मात्र मेच्या दरम्यान तलावांतील जलसाठा आटू लागला आहे.

३,८०० दशलक्ष लिटर रोज पुरवठाउर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून मुंबईकरांना दररोज सुमारे ३,८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे सातही तलावांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे वर्षभराची मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली असून, उन्हाच्या काहिलीने मुंबईकर हैराण झाले आहेत. त्याचवेळी तलावांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते. तसेच ठाणे येथे कूपनलिका खोदताना जलबोगद्याला पडलेल्या भगदाडामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा अपव्यय झाला होता. जलबोगद्याच्या कामामुळे मुंबईत पाणी कपात केली होती. 

टॅग्स :मुंबई