मुंबई - अजित पवार Ajit Pawar यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या शरद पवारांचा पक्षच भाजपने फोडला आहे. कारण, अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांपैकी ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्याच्या राजकारणातील या धक्कातंत्रामुळे नेमकं काय चाललंय, असा प्रश्न जनतेला पडला आहे. या धक्कातंत्राबाबत अजित पवार यांनी भूमिका स्प्ष्ट केली आहे. तसेच, केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि देशपातळीवर मोदींना समर्थन देण्यासाठी हा निर्णय झाल्याचेही पवार यांनी सांगितले.
विकासाला महत्त्व दिलं पाहिजे असं मत माझं आणि माझ्या सहकाऱ्यांचं झालं. त्यातच, गेल्या ९ वर्षात नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीने देशाला पुढे नेण्याचं काम केलंय, ज्याप्रमाणे विकासाचं काम केलंय, ते पाहता त्यांच्यासोबत जायला हवं, असं आमचं मत आहे. देशाच्या राजकारणात आज सर्वच राजकीय पक्ष एकत्र येऊन नरेंद्र मोदींना विरोध केला आहे. त्यामुळेच, ही राजकीय परिस्थिती पाहता, आम्ही मोदींसमवेत जाण्याचा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच या सत्तेत, सरकारमध्ये सहभागी झालो आहे. यापुढील निवडणुका आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणुका लढवणार आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार यांनी आज शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा आला आणि मी तो स्वीकारला असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे. अजित पवारांसोबत ४० आमदार होते. तर ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे की अजित पवार यांच्या गटाचा अशी चर्चा रंगली आहे. अजित पवारांच्या शपथविधीला नुकतीच पक्षाची मोठी जबाबदारी मिळालेले आणि शरद पवार यांचे विश्वासू प्रफुल्ल पटलेही उपस्थित होते. त्यामुळे, आता शरद पवार काय भूमिका घेतात, हेही पाहायचं आहे. मात्र, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच सत्तेसत सहभागी झालो आहोत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.