...तर आम्ही नक्कीच सरकार स्थापन करू, छगन भुजबळ यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 10:42 PM2019-11-05T22:42:08+5:302019-11-05T22:42:46+5:30
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा गुंता आता अधिकच जटील झाला आहे.
मुंबई - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा गुंता आता अधिकच जटील झाला आहे. दरम्यान, महायुतीने सरकार स्थापन न केल्यास मुदतपूर्व निवडणूक टाळण्यासाठी संधी मिळाल्यास आम्ही सरकार स्थापन करू, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केले आहे.
छगन भुजबळ सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत म्हणाले की, कुणीही सरकार स्थापन केले नाही आणि राज्यात आजच्या घडीला पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर अशी निवडणूक लढण्याची इच्छा कुठल्याही पक्षाची नाही. त्यामुळे भाजपाने स्थापन केले नाही. तर इतर कुणी करेल. मुदतपूर्व निवडणुकीची परिस्थिती टाळण्यासाठी आम्हीदेखील जरूर सरकार स्थापन करू.''
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सरकार स्थापन करण्याइतपत आकडे नसल्याचाही पुनरुच्चार छगन भुजबळ यांनी केला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही भाजपा आणि शिवसेनेवर टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणंघेणं नाही, मुख्यमंत्री कोणाचा होणार याचीच काळजी असल्याचं म्हणत त्यांनी सेना-भाजपावरही जोरदार हल्लाबोल केला.
पुढे ते म्हणाले, शेतीच्या प्रश्नाबाबत राज्यपालांनी हस्तक्षेप करावा. सांगली, कोल्हापूरमधील शेतकऱ्यांना अद्याप मदत पोहोचलेली नाही. ओल्या दुष्काळाची माहिती राज्यपालांना दिली असून, वीजबिल आणि कर्जमाफीची राज्यपालांकडे मागणी केल्याचंही अजित पवारांनी सांगितलं आहे. खरिपाचं पिकंही वाया गेलं आहे. तातडीनं हेक्टरी 1 लाखांची मदत द्या. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. हे सरकारचं अपयश असून, आम्हाला राजकारण करायचं नाही. क्यार आणि महा चक्रीवादळामुळे मच्छीमारांचं अतोनात नुकसान झालेलं आहे.