Join us

...तर गरिबांच्या घरांसाठी सरकार विरोधात लढू - गोपाळ शेट्टी 

By मनोहर कुंभेजकर | Published: June 14, 2024 4:50 PM

वांद्रे पूर्व एसआरए कार्यालयाबाहेर निवडणूक निकाल जाहिर झाल्यानंतर दोन दिवसांनी गोपाळ शेट्टी यांनी 'कल्याण कर, कल्याण करा' या आशयाचे बॅनर गोपाळ शेट्टी यांनी लावले होते.

    मुंबई -आपला देश स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानंतरही गरिबांच्या घरांचा प्रश्न सुटलेला नाही. गरिबांना त्यांच्या हक्काचे घर मिळावे यासाठी वेळ पडल्यास आमच्या सरकारच्या विरोधात लढू आणि गरिबांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देऊ, अशी प्रतिक्रिया माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केली . 

वांद्रे पूर्व एसआरए कार्यालयाबाहेर निवडणूक निकाल जाहिर झाल्यानंतर दोन दिवसांनी गोपाळ शेट्टी यांनी 'कल्याण कर, कल्याण करा' या आशयाचे बॅनर गोपाळ शेट्टी यांनी लावले होते. या बॅनरची चर्चा रंगली असतानाच त्यांनी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान बंद पडलेल्या एसआरए योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी त्यांनी  केली. 

मुंबईमधील ५० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. त्यांना हक्काची घरे मिळण्यासाठी एसआरए योजना सुरु केली. मात्र स्थानिक कार्यकर्ते, नेते, अधिकारी यांच्यामुळे ही योजना बंद पडली. एसआरए प्रमुख कल्याणकर यांनी योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गरिबांचे नक्की कल्याण होईल असा विश्वास शेट्टी यांनी व्यक्त केला. 

 मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्टीत पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांच्या घरांचा प्रश्न आहे. सरकारने १९७६ पर्यंतच्या लोकांसाठी निर्णय घेतला आहे. मात्र २००० पर्यंतच्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. गोरेगावमध्ये ३४० पैकी २७० रहिवाशांना १९६२ची मान्यता देण्यात आली आहे. इतर रहिवाशांना हक्काची घरे मिळावीत म्हणून सरकारने निर्णय घ्यावा अशी मागणी शेट्टी यांनी केली. 

टॅग्स :गोपाळ शेट्टीमुंबई