राज्यभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे जाऊन अभिवादन केले. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याची घोषणाही केली. त्यामुळे, आता लवकरच या शहराचे नाव अहिल्यानगर होईल, अशी सर्वांना आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनीही या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, युती सरकारला टोलाही लगावला होता. आता, आमदार पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रश्नांवरुन राज्य सरकारला इशारा दिला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी माझ्या मतदारसंघातील MIDC ची अधिसूचना काढण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. पण, ही तारीख उलटून गेली तरी सरकारने अधिसूचना काढली नाही. आता, राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीपर्यंत (२६ जून) वाट पाहू आणि तरीही अधिसूचना काढली नाही तर आधी जाहीर केल्याप्रमाणे माझ्या मतदारसंघातील युवा आणि नागरिकांसह मंत्रालयात उपोषण करून जनतेची ताकद दाखवून देऊ, अशा शब्दात रोहित पवार यांनी राज्य सरकार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना इशारा दिला आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसी संदर्भात अधिसूचना काढण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे यांसदर्भात स्मरणपत्रही दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात येथील एमआयडीसीला मान्यता देण्यात आली आहे. तसेच, इतर तांत्रिक बाबीबी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे, आश्वासनानुसार महायुती सरकारने अधिसूचना काढावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली होती. तसेच, राजकीय द्वेषामुळे माझ्या मतदारसंघातील MIDC ची अधिसूचना सरकार काढत नसल्याचा आरोपही पवार यांनी केला होता. त्यामुळे, आता पुढील तारीख देत रोहित पवार यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.