ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 22 - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपामध्ये चर्चांच्या फेऱ्यामागून फेऱ्या पार पडत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना युतीबाबत फार बोलणे टाळले. युतीच्या प्रश्नावर आज मला काही बोलायचे नाही. चर्चा सुरू आहे, पण युतीचा प्रस्ताव अद्याप आपल्याकडे आलेला नाही. हा प्रस्ताव आला की आम्ही आमचा निर्णय घेऊ, असे सांगत उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेतील युतीच्या प्रश्नाला बगल दिली.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपामध्ये मुंबई महानगरपालिकेतील युतीबाबत सुरू असलेल्या बैठका आणि चर्चेच्या गुऱ्हाळांच्या पार्श्वभूमीवर आज च्या पत्रकार परिषदेत युतीबाबत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण उद्धव ठाकरे यांनी युतीच्या प्रश्नावर सावध पवित्रा घेत या प्रश्नाला बगल दिली.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुंबईप्रमाणेच ठाणे आणि उल्हासनगरमधील नागरिकांसाठी आर्षक घोषणा केल्या. पुन्हा सत्ता आल्यास मुंबईप्रमाणेच ठाणे आणि उल्हासनगरमध्ये 500 फुटापर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचा तर ठाण्यातील 700 फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सवलत देण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. तसेच ठाणेकरांसाठी स्वतंत्र धरण आणि ठाण्यात एक सुसज्ज सेंट्रल पार्क उभारण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्याबरोबरच मुंबईतील गणवेशधारी शाळकरी विद्यार्थ्यांना बेस्टमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात येईल अशी घोषणाही त्यांनी केली.