...तर आम्ही आमच्या १३.१८ एकरचा ताबा घेऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 02:42 PM2020-09-04T14:42:17+5:302020-09-04T14:45:06+5:30
गोरेगाव सिद्धार्थ नगर पत्रा चाळ संघर्ष समितीचा म्हाडावर मोर्चा
मुंबई : गोरेगाव सिद्धार्थ नगर पत्रा चाळ संघर्ष समितीने शुक्रवारी सकाळी ११ वाजता सामाजिक अंतर पाळत वांद्रे येथील म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढला होता. पोलीस बंदोबस्तात संघर्ष समितीच्या ६ जणांच्या शिष्टमंडळाने म्हाडाचे मुख्य अधिकारी म्हसे यांची भेट घेतली. यावेळी म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर उपस्थित होते. तर समितीमध्ये मकरंद परब, राजेश दळवी, सुरेश व्यास, पंकज दळवी, नरेश सावंत व परेश चव्हाण हे होते. हा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही आमच्या १३.१८ एकरचा ताबा घेऊ, असे पत्राचाळ संघर्ष समितीने यावेळी सांगितले.
पत्राचाळ संघर्ष समितीने यावेळी आपल्या व्यथा पत्रकाद्वारे मांडल्या. म्हाडाने समितीच्या पत्राचे उत्तर १५ दिवसात देऊ, असे सांगितले. तर दुसरीकडे पत्राचाळ संघर्ष समितीने हा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही आमच्या १३.१८ एकरचा ताबा घेऊ असे सांगितले. गोरेगाव सिद्धार्थ नगर पत्रा चाळ येथील रहिवासी गेल्या अनेक वर्षापासून पुनर्विकास प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे आपल्या हक्काची जागा सोडून मुंबईबाहेर राहात आहेत. म्हाडाने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काही केले नाही, असा या रहिवाशांचा आक्षेप आहे. याचा निषेध म्हणून हा मोर्चा काढला गेला. गेले अनेक वर्ष हा गृहनिर्माण प्रकल्प रखडलेलाआहे. अनेक रहिवासी आपली हक्काची जागा सोडून मुंबई बाहेर राहायला गेले आहेत. पण हा प्रकल्प अजून काही पूर्ण होत नाही. म्हाडाच्या असमर्थतेमुळे शेकडो कुटुंबे आज आपले घर गमावून बाहेर आसरा शोधत आहेत. अनेक रहिवासी राहत्या जागेचे भाडे देऊ शकत नाही. त्यांच्या जागेचा प्रश्न बिकट ठरला आहे. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढला गेला.