मुंबई - कोहिनूर मिल व्यवहार प्रकरणी होणाऱ्या चौकशीसाठी मनसेप्रमुखराज ठाकरे ईडीच्या कार्यालयात दाखल होताना त्यांच्या सोबत कुटुंबातील सर्व सदस्यसुद्धा गेले होते. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? अशी टीका केली होती.
त्यावर मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत अंजली दमानिया यांना सोशल मीडियात ट्रोल केलं. दिवसभर दमानिया यांना अनेकांनी फोन केले, मेसेज पाठविले. तसेच राजकीय नेत्यांनीही अंजली दमानिया यांच्या विधानावर आक्षेप घेत त्यांना विरोध केला. ईडी चौकशीनंतर राज ठाकरे बाहेर पडले त्यावेळी अंजली दमानिया यांनी आता राज ठाकरेंना एक मेसेज पाठवला आहे. त्यात त्यांनी मला होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्न केला आहे.
यामध्ये मेसेजमध्ये अंजली दमानिया यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग केलं. तसेच मी लोकशाहीत राहते आणि मला माझे मत मांडण्याचा अधिकार आहे असा मेसेज त्यांनी राज ठाकरेंना केला आहे. तसेच या पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीन शॉट काढत त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
कोहिनूर मिल प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने चौकशीसाठी (२२ ऑगस्ट) रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज (२२ ऑगस्ट) रोजी राज ठाकरे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. साडेआठ तासांच्या ईडीच्या चौकशीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी पोहचले त्यावेळी घराबाहेर अनेक मनसे कार्यकर्ते जमा झाले होते. या उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज ठाकरेंनी सांगितलं की, ईडीच्या चौकशीत मला जे काही सांगायचे आहे ते मी त्यांना सांगितले आहे. अशा कितीही चौकशी लावल्या तरीही माझं तोंड बंद ठेवणार नाही अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिली.