मुंबई - गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांचा गाजलेला 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. तब्बल १० वर्षांच्या ब्रेकनंतर हा कार्यक्रम सुरु होत असून याच्या पहिल्याच भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हजेरी लावणार आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो समोर आला होता. त्यामध्ये, राज ठाकरे यांनी त्यांच्या फटाकेबाजीला सुरुवात केल्याचं दिसून आलं. आता, या कार्यक्रमातील दुसरे गेस्ट हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असणार आहेत. याचाही प्रोमो सोशल मीडियातून समोर आला आहे.
झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर खुपते तिथे गुप्तेच्या भागाचा प्रोमो शेअर करण्यात येत आहे. पहिल्या प्रोमोमध्ये राज ठाकरे यांनी अजित पवार (ajit pawar) यांच्यावर निशाणा साधत त्यांची मिमिक्रीही केली. इतकंच नाही तर त्यांनी त्यांचा लेक पार्थ पवार यांच्यावरुनही टोला लगावला. आता, मुख्यमंत्री आणि ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे यांची एंट्री या कार्यक्रमात झाली आहे. या कार्यक्रमात अवधुत गुप्ते मुख्यमंत्री शिंदेंना प्रश्न विचारतो. जर तुम्हाला एक फोन करायची संधी देण्यात आली, तर तो कॉल तुम्ही कोणाला कराल. दिवंगत आनंद दिघे यांना की दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना?. गुप्तेंच्या या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी डिप्लोमॅटीक उत्तर दिलं आहे. अरे अवधुत, कॉन्फरन्स कॉल केला तर चालेल, मला दोघांशीही बोलायचंय, असे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं आहे. त्यामुळे, आता या कार्यक्रमातील मुख्यमंत्री शिंदे यांच्याही नव्या एपिसोडची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
दरम्यान, ४ जून २०२३ पासून हा खुपते तिथे गुप्ते ह्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांचीही मुलाखत अवधुत गुप्ते घेणार आहे.
राज ठाकरेंचाही प्रोमो शेअर
'खुपते तिथे गुप्ते'च्या मंचावर राज ठाकरे यांना अजित पवारांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओमध्ये अजित पवार, राज ठाकरेंविषयी भाष्य करत आहेत. . “एकदा इलेक्शनमधून बाहेर पडल्यावर १४ आमदार निवडून आणले. की सगळे लोक त्यांच्यापासून दूर गेलेले,” असं अजित पवार म्हणतात. हा व्हिडीओ पाहिल्यावर राज ठाकरे यांनीही त्यांच्या शैलीत सडेतोड उत्तर दिलं.