मग प्रवेशाच्या नोंदणीला विलंब का? यांद्यांची गरज नसतानाही होत असलेल्या दिरंगाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 09:30 AM2023-06-21T09:30:55+5:302023-06-21T09:31:14+5:30
सीईटी सेलने सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर केल्यानंतर १५ जूनपासून टप्प्याटप्प्याने प्रवेश प्रक्रियांची नोंदणी सुरू होणार होती. मात्र, आठवडा उलटूनही प्रवेश सुरू झाले नसल्याचे चित्र आहे.
मुंबई: अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया सीईटी सेलमार्फत अजून सुरू न झाल्याने विद्यार्थी- पालक हवालदिल झाले आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रिया नियम अंतिम न झाल्याने आणि संस्थांची नोंदणी अजूनही सुरू असल्याने प्रवेश प्रक्रिया सुरू केली नसल्याचे सीईटी सेल प्रशासनाने म्हटले आहे. मात्र, प्रवेशाची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी सीईटी सेलला संस्थांची नोंदणी पूर्ण होण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नसल्याचे मत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. तर संस्थांच्या याद्यांची गरज नसताना प्रवेश प्रक्रिया का लांबली? असा सवाल शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि जाणकारांनी उपस्थित केला आहे.
सीईटी सेलने सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर केल्यानंतर १५ जूनपासून टप्प्याटप्प्याने प्रवेश प्रक्रियांची नोंदणी सुरू होणार होती. मात्र, आठवडा उलटूनही प्रवेश सुरू झाले नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे तंत्रशिक्षण शिक्षण संचालनालयाने (डीटीई) राज्यातील अभियांत्रिकी संस्थांची यादी अपडेट न केल्यामुळे प्रवेश प्रक्रियेची नोंदणी सुरू करण्यात येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र प्रवेश नोंदणी सुरू करण्यासाठी सीईटी सेलला याद्यांची आवश्यकताच नाही. मग सीईटी सेलकडून प्रक्रियेला विलंब का होत आहे, असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत. या सर्व प्रवेश प्रक्रियेला उशीर होणारच होता तर सीईटी सेलने प्रवेश नोंदणीचे वेळापत्रक ही प्रसिद्ध करण्याची घाई का केली असाही सवाल पालकांनी केला आहे.
सीईटी सेलकडून १५ जूनपासून इंजिनीअरिंग, ॲग्रिकल्चर , बी-फार्म, एमबीए, एमसीए, लॉ, बीए, बीएस्सी बीएड, बीएड- एमएड, एम फार्म अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांची नोंदणी सुरू होणार होती. मात्र, बीए/बीएस्सी बीएड आणि लॉ (पाच) वर्षे) या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांची नोंदणी सुरू झाली. असून, इतर अभ्यासक्रमांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
बीएचएमसीटी, बी प्लॅनिंग, बीएड, एमएड, बी-डिझाइन, एमई/ एमटेक अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियांची नोंदणी १६ जूनपासून सुरू होणार होती. मात्र, अद्याप नोंदणीला सुरुवात झालेली नाही,. बीएड अभ्यासक्रमासाठी नोंदणी प्रक्रिया २३ जूनपासून सुरू होणार आहे.
एमपीएड, बीपीएड, एम-आर्च, एम-एचएमसीटी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नोंदणी १८ जूनपासून सुरू होणार होती. मात्र, नोंदणी प्रक्रिया रखडलेलीच आहे. त्याचप्रमाणे माहितीही उपलब्ध नाही. लॉ (तीन वर्षे) अभ्यासक्रमासाठी २३ जूनपासून नोंदणी सुरू होणार आहे.