...तर सुशांतला एकटे का सोडले ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 11:35 AM2020-07-14T11:35:43+5:302020-07-14T11:36:29+5:30
मानसोपचारतज्ज्ञांचा कुटुंबीयाना सवाल; बायपोलर व पैरानोयाबाबतीतही उपस्थित केली शंका
मुंबई: सुशांतला बायपोलर व पैरानोयासारखे मानसिक आजार होते, तर त्याची कथित प्रेयसी रिया चक्रवर्ती त्याला का एकटे सोडून गेली? तसेच त्याच्या अशा अवस्थेत त्याचे नातेवाईक त्याच्या जवळ का नव्हते? त्याला त्यांनी का एकटे सोडले? असे प्रश्न सध्या मानसोपचार तज्ज्ञांकडून उपस्थित केले जात आहेत.
सुशांतच्या आत्महत्येच्या जवळपास १२ दिवस आधी रिया त्याला सोडून निघुन गेली. तिचे सुशांतशी भांडण झाले होते. त्यानेच तिला निघून जाण्यास सांगितले होते असे तिने पोलिसांना सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मानसोपचार तज्ज्ञांनी 'लोकमत' ला दिलेल्या माहितीनुसार, 'बायपोलर' आणि 'पैरानोया' च्या लक्षणात सर्वात घातक बाब म्हणजे अशा रुग्णाला आत्महत्येचे विचार येतात व बऱ्याचदा ती कृती ते प्रत्यक्षात करतात. रुग्णांच्या जीवाला असलेल्या धोक्यामुळेच त्यांचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांना आम्ही याबाबत कल्पना देतो. त्यांना एकटे न सोडता त्यांच्यावर सतत कोणाचे तरी लक्ष असणे गरजेचे असते. त्यांच्या झोपेची वेळ विशेषतः यात पाहिली जाते जी कमीतकमी आठ तास असणे आवश्यक आहे. मात्र सुशांतचे वडील तसेच मुंबईत राहणाऱ्या बहिणीला त्याच्या मानसिक आजाराबद्दल काहीच माहिती नसल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यातच सुशांत हा रियासोबत राहत होता. वर्षभर त्याच्यावर उपचार सुरू होते. त्यामुळे डॉक्टरने त्याच्या मानसिक स्थितीची कल्पना रियाला अथवा त्याच्या कुटुंबियांना नक्कीच दिली असणार, असे असूनही ती त्याला एकट्याला सोडून कशी गेली? तसेच त्याच्या कुटुंबियांनी त्याच्यावर लक्ष का दिले नाही? यावरून शंका उपस्थित केली जात आहे. तसेच काही तज्ज्ञांनी तर सुशांतच्या एकंदर लक्षणांवरून तो अशा काही विकाराने ग्रस्त होता या बाबीवरच अविश्वास वर्तविला आहे.
'बातमी' कुठेच नाही !
'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' व 'छिछोरे' सारख्या बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवणारा बडा चित्रपट अभिनेता सुशांत हा आठवडाभर रुग्णालयात दाखल असतो पण याची माहिती त्यावेळी वृत्तवाहिनी, वृत्तपत्र तसेच एकाही वेबचॅनेलवर कशी नाही असाही प्रश्न विचारला जात आहे.
माहिती देऊ शकत नाही
लॉकडाऊन पूर्वी त्याला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र रुग्णाची कोणतीही माहिती उघड करण्याची परवानगी नसल्याचे उत्तर रुग्णालय प्रवक्त्याकडून देण्यात आले.