मुंबई - राज्य विधिमंडळाचे वर्षातून तीन अधिवेशन घेतले जातात. तर, काहीवेळा गरज भासल्यास विशेष अधिवेशनही बोलविण्यात येते. या तीन अधिवेशनापैकी दोन अधिवेशनाचे कामकाज मुंबईतील विधानसभा सभागृहातून चालते. त्यासाठी, राज्यातील सर्वच आमदार मुंबईला येतात. तर, हिवाळी अधिवेशन दरवर्षी उपराजधानी नागपूरला घेतले जाते. त्यासाठी, राज्यातील सर्वच विधानसभा आणि विधानपरिषद सदस्य नागपूरला येतात. मात्र, एक अधिवेशन नागपूरला का होते? असा प्रश्न अनेकांना पडतो, विशेष म्हणजे नवख्या आमदारांना तर नेहमीच पडतो. आता, नवनिर्वाचित आमदार संदीप क्षीरसागर यांनीच आठवणी सांगत याचं उत्तर दिलंय.
''बालपणी कायम विचार करायचो की, विधानसभा तर मुंबईत आहे, अधिवेशन देखील मुंबईत विधिमंडळात होते. मात्र हिवाळी अधिवेशन नागपूर ला का बरे होत असावे? काळाच्या ओघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करतांना कधी मुंबई तर कधी नागपूर अधिवेशनात बीडच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पक्षाच्या नेत्यांना भेटण्यासाठी जायचो. या सर्व कामकाजादरम्यान माहिती घेतली असता समजले की, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीवेळी झालेल्या नागपूर करारामध्ये हिवाळी अधिवेशन नागपूर शहरात घेण्यात यावे, असे ठरले असल्याचे समजले,'' असे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. तसेच, पहिल्यांदाच विधानसभेचा सदस्य म्हणून सभागृहात जात असल्याचा अत्यानंद होत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
बीड जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून मी अनेकवेळा नागपूर अधिवेशनात आलो, प्रवेशाचा पास घेऊन विधिमंडळात प्रवेश मिळवायचो. विधिमंडळाचे कामकाज गॅलरीतून पाहायचो, कधी विचार केला नव्हता की याच पवित्र सभागृहातून माझ्या बीड विधानसभेचे प्रलंबित प्रश्न मी मांडेन. माझ्या बीड विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा आशीर्वाद, सहकाऱ्यांची खंबीर साथ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी आणि शरद पवार यांच्या झंझावाती प्रचारामुळे मोठ्या संघर्षातून आज नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात माझ्या बीड मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून मी उपस्थित आहे. ज्या मतदारांनी मला हे भाग्य मिळवून दिले त्यांचा आवाज म्हणून, सेवक म्हणून सदैव कार्यरत राहील, अशी फेसबुक पोस्ट संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.