Join us

...तर यंदा केवळ हजार भारतीयांना हज यात्रेची संधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:06 AM

सौदी सरकारच्या निर्णयाकडे लक्षजमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यंदाच्या हज यात्रेसाठी परदेशी नागरिकांना अनुमतीबाबत सौदी ...

सौदी सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : यंदाच्या हज यात्रेसाठी परदेशी नागरिकांना अनुमतीबाबत सौदी अरेबिया सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. मात्र त्यांनी लागू केलेल्या नियमानुसार परवानगी दिल्यास जास्तीतजास्त केवळ एक हजार भारतीयांना भाग घेता येणार आहे. निर्बंधामध्ये थोडी शिथिलता आणल्यास ५,९०० जणांना पाठविता येणार आहे.

सौदीमध्ये मक्का-मदिनेत होणाऱ्या यात्रेला गेल्या वर्षी परदेशी नागरिकांना बंदी घालण्यात आली होती. या वर्षी हज यात्रेचा मुख्य विधी २० जुलैला होत आहे. मात्र त्यामध्ये भारतीयांसह परदेशी नागरिकांना प्रवेश द्यायचा की नाही याबद्दल अद्याप त्यांच्याकडून ठरविण्यात आलेले नाही. परंतु त्यांनी एप्रिलमध्ये जे इच्छुक आहेत, त्यांनी जूनपर्यंत कोरोनाच्या दोन्ही लस घेण्याच्या सूचना केल्या होत्या. केवळ १८ ते ६० वयोगटातील स्त्री-पुरुषांना प्रवेश दिला जाण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार हज कमिटीकडे यंदा आलेल्या ५८ हजार अर्जांपैकी केवळ १ हजार जणांनी त्याची पूर्तता केली आहे. तर वयोमर्यादा व एक लस व फ्लाईटच्या उड्डाणस्थळाच्या निर्बंधाबाबत शिथिलता आणल्यास ५,९०० जण हजसाठी पात्र ठरू शकतात, याबाबतची माहिती हज कमिटी ऑफ इंडियाने अद्ययावत ठेवली आहे.

इस्लाम धर्मीयांमध्ये महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या हज यात्रेसाठी भारतातून दरवर्षी सुमारे पावणे दोन लाखांवर भाविक सहभागी होत असतात.

* ‘जान है तो जहान है’ अभियान

कोरोनावर प्रभावकारक ठरणाऱ्या लस घेण्याबाबत अनेक अफवा व गैरसमज पसरविले जात आहेत. ते दूर करण्यासाठी अल्पसंख्याक विकास मंत्रालयाकडून ‘जान है तो जहान है’ हे अभियान चालविले जात आहे. त्याबाबत केंद्रीय मंत्री नक्वी यांनी हज कमिटीमध्ये गुरुवारी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी भारत सरकार सौदीच्या निर्णयासोबत असणार असल्याचे स्पष्ट केले.

* निर्धारित मुदतीमध्ये लस घ्यावी

हज यात्रेला मंजुरी मिळाल्यास त्याच्या सर्व अटी व नियमांचे पालन करून यात्रेकरूंना पाठविले जाईल. त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता युद्धपातळीवर केली जाईल. लसीचे दोन्ही डाेस घेतले असतील, त्यांनाच पाठविले जाईल. त्यामुळे अर्ज केलेल्यांनी निर्धारित मुदतीमध्ये लस घ्यावी.

- डॉ. मकसूद अहमद खान

(मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी ऑफ इंडिया)

--------------------------------------