Join us

...म्हणून योगींनी आग्रा येथील म्युझियमला दिलं शिवरायांचं नाव, निर्णयाचं कौतुक करत शिवसेनेनं सांगितलं महत्त्वाचं कारण

By बाळकृष्ण परब | Published: September 20, 2020 9:08 AM

उत्तर प्रदेशात आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने म्युझियम उभे राहत आहे. अयोध्येत राम मंदिर उभे राहण्याइतकेच महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देशिवाजी महाराजांचे स्मरण करणे हा राष्ट्रधर्म छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम करण्यामागे श्रद्धा, आदर आणि तितकेच भविष्यातील राजकारणआता उत्तर प्रदेशात राम मंदिर आणि शिवाजीराजे म्युझियम यांना महत्त्व येईल

मुंबई - उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे ऊभारण्यात येत असलेल्या मुघल म्युझियमचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला होता. योगींच्या या निर्णयाचे आता शिवसेनेने कौतुक केले आहे. आग्र्यातील मुघल म्युझियमचे नाव योगी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम केले यात श्रद्धा, आदर आणि तितकेच भविष्यातील राजकारण आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनामध्ये आज प्रसिद्ध झालेल्या, लेखामध्ये म्हटले आहे.सामनामधील लेखात संजय राऊत यांनी म्हटले की, उत्तर प्रदेशात आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने म्युझियम उभे राहत आहे. अयोध्येत राम मंदिर उभे राहण्याइतकेच महत्त्वाचे आहे. शिवाजी महाराजांचे स्मरण करणे हा राष्ट्रधर्म आहे. अमूक तमूक त्याच्या क्षेत्रातील छत्रपती शिवाजी आहे म्हणणे म्हणजे त्याने त्याच्या क्षेत्रात शिखरच गाठले असा, अर्थ होतो. आग्रा येथे बनत असलेल्या मुघल म्युझियमला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. देशाचा महानायक मुघल कसा असू शकतो? तो हिंदू पदपादशाहच असू शकतो. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाहीत, हे त्यांना दाखवून द्यायचे आहे. उत्तर प्रदेशाता गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना स्थान नाही हे त्यांनी दाखवून दिले. यामागे थोडी राजकीय विचारांची ठिणगी असायला हवी.दुसरीकडे महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचे अरबी समुद्रातील स्मारक अद्यापही उभे राहिलेले नाही. शिवरायांचे गडकिल्लेही जीर्ण अवस्थेत पोहोचले आहेत. या सगळ्यात योगी महाराजांनी मुघल म्युझियमचे नाव बदलून फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम केले. याचे राजकीय पडसाद उमटतील. यापूर्वी महाराष्ट्राचे डॉ. आंबेडकर आणि आता छत्रपती शिवाजी महाराज उत्तर प्रदेशच्या राजकीय मैदानात उतरवले जातील. म्हणजे आधी श्रीराम आता शिवाजी महाराज. २०१४ निवडणुकीत मोदींसोबत शिवाजी महाराजांचे छायाचित्र वापरून मते मागितली गेलीच होती. छत्रपतींचा आशीर्वाद आम्हालाच असा प्रचारही झाला होता. आता उत्तर प्रदेशात राम मंदिर आणि शिवाजीराजे म्युझियम यांना महत्त्व येईल. ते काही असो, आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने म्युझियम उभे राहणे हे ऐतिहासिक कार्य आहे. ज्या दरबारात छत्रपतींनी स्वाभिमानाचे बंड केले. त्याच दरबारात घुसून छत्रपतींनी औरंगजेबाच्या हातातील तलवारच जणू खेचून घेतली. मुख्यमंत्री योगींना हे सुचले व त्यांनी ते केले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, असे संजर राऊत यांनी या लेखात म्हटले आहे.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराजयोगी आदित्यनाथभाजपाउत्तर प्रदेशशिवसेनासंजय राऊत