शिक्षण विभागातील प्रश्नाचे भिजत घोंगडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 05:57 PM2020-05-21T17:57:28+5:302020-05-21T17:58:13+5:30
भूगोल पेपरची गुणपद्धती, नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन, शिक्षक प्रश्नांसाठी शिक्षण बचाव आंदोलन
मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव तर दुसरीकडे शिक्षण क्षेत्रातील गोंधळ वाढत असून शालेय शिक्षण विभाग कोणताही ठोस निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ भाजपा शिक्षक आघाडी आजपासून राज्यात शिक्षण बचाव आंदोलन करणार आहे. या दरम्यान लॉकडाऊन चे सर्व नियम काटेकोरपणे पाळून राज्यभरातील शिक्षण उपसंचालक तसेच प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला जाणार असल्याची माहिती भाजपा शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी दिली.
दहावीच्या भूगोल विषयाच्या गुणांचा तिढा अजूनही कायम असल्याने राज्यातील जवळपास १६ लाख पालक संभ्रमात आहेत. यावर शिक्षण विभागाने व राज्य मंडळाने ठोस निर्णय घेतलेला नाही. शिक्षण मंत्री यावर तसेच पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन कसे असेल ? कधी सुरु करता येईल यावरही बोलण्यास तयार नाहीत, यामुळे पालक शिक्षकांमधील गोंधळ वाढत आहे. शाळांमधील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन करण्याची प्रक्रीया अद्याप सुरू करण्यात आली नाही , विद्यार्थी संख्येअभावी पुढील शैक्षणिक वर्षात शिक्षकांना अतिरिक्त करण्यात येऊ नये असा शासन निर्णय अद्याप निर्गमित करण्यात आला नाही असे अनेक प्रश्न असून या प्रश्नांचे केवळ भूज्त घोंगडे शिक्षण विभागाकडून ठेवण्यात आल्याची प्रतिक्रिया बोरनारे यांनी दिली.
कोविड १९ च्या कामासाठी शिक्षकांना चेकपोस्ट, राशन दुकाने, मद्य विक्रीच्या दुकानात गर्दी नियंत्रणासाठी शिक्षकांच्या उपस्थितीचे आदेश देऊन शिक्षकांची प्रतिमा मलिन करण्याचा प्प्प्ररयत्रन करण्ययात आला. तसेच शिक्षक भरतीवर बंदी आणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करून शिक्षकांची बेरोजगारी वाढविण्याचे शिक्षण विभागाचे षडयंत्र असल्याचे त्यांनी म्हटले. १ एप्रिल २०१९ पासून २० टक्के वेतन अनुदान व २० टक्के वाढीव वेतन अनुदान थकबाकीसह तरतूद असूनही अध्याप शिक्षकांना देण्यात आले नाही , अपंग समावेशीत शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक व परिचारक यांचे न्यायालयीन निर्णयानुसार थकीत व नियमित वेतन तातडीने देण्याचे आदेश असूनही अद्याप देण्यात आले नाही, मागील सहा महिन्यात निवृत्त झालेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तातडीने पेंशन सुरू करून इतर लाभ मिळत नसल्याने शिक्षकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. अशा अनेक प्रश्नावर शिक्षण विभाग व शिक्षणमंत्री मुग गिळून बसले आहेत. याचाच निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.