मालवणीत बेघर झालेल्या रहिवाशांची सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकरांनी घेतली भेट
By मनोहर कुंभेजकर | Published: July 29, 2023 08:53 AM2023-07-29T08:53:45+5:302023-07-29T08:58:28+5:30
मालवणी, अंबोजवाडीतील २५० घरांवर तोडक कारवाई प्रकरण
मुंबई - मागील आठवड्यात मालवणी, अंबोजवाडी येथील २५० घरांवर भर पावसात तोडक कारवाई करण्यात आली. भर पावसात मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या या कारवाईचा सर्वच स्तरांतून निषेध होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी शुक्रवारी सायंकाळी बेघर कुटुंबीयांची भेट घेतल्याने कुटुंबीयांच्या लढ्याला बळ मिळालं आहे. आमदार अस्लम शेख यांनी अन्यायाविरोधात विधानसभेत आवाज उठवला. आपणही कायदेशीर व रस्त्यावरचा लढा न्याय मिळेपर्यंत लढत राहुया असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यावेळी स्थानिकांशी संवाद साधताना मेधा पाटकर म्हणाल्या, जेव्हा बिल्डरशाही शासनाचा आधार असते आणि मंत्री आणि अधिकारी बिल्डरांशी जोडले जातात. तेव्हाच अशा प्रकारच्या घटना घडतात. २५० घरं का तोडली गेली? कोणत्या बिल्डरचे कोणत्या नेत्यासोबत संबंध आहेत, हे देखील मी सांगू शकेन असे त्या यावेळी म्हणाल्या. मुळात पावसाळ्यात तोडक कारवाई करणच अवैध आहे. १ जून नंतर कोणतीही बांधकामं तोडू नयेत असा शासन आदेश असताना तोडक कारवाई का करण्यात आली याचे उत्तर प्रशासनाला द्यावेच लागेल असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मालवणीतील तोडक कारवाईप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी घेतली रहिवाशांची भेट #Mumbaipic.twitter.com/OZU6mIjy24
— Lokmat (@lokmat) July 29, 2023
मुंबईतील ६० टक्के लोक गरीब वस्तीत राहतात. मी या वस्त्यांना झोपडपट्टी म्हणणार नाही. कारण झोपडी असो वा महल.. घर हे घरच असतं. या गरीब वस्त्यांमध्ये राहणारे लोक श्रीमंतांचे महल उभे करतात. पण महल उभे करणाऱ्या या गरीबांच्या डोक्यावर छत नसावं ही सर्वात मोठी शोकांतिका आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या वस्तीमध्ये गरीबांच्या मुला-मुलींसाठी चालविण्यात येणारी शाळा देखील उद्ध्वस्त करुन प्रशासनाने निष्ठूरतेची परिसीमा गाठली आहे. यावेळी मेधा पाटकर यांनी बेघर कुटुंबीयांची तात्पुरती निवाऱ्याची सोय व्हावी याकरिता ताडपत्रींचे वितरण केले. तसेच कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी सर्व कागदपत्रे व पुरावे जमा करण्याचे आवाहन देखील केले.