सामाजिक बांधिलकीचा ‘विद्यार्थ्यांचा राजा’
By admin | Published: September 3, 2016 02:14 AM2016-09-03T02:14:34+5:302016-09-03T02:14:34+5:30
महाविद्यालयीन तरुणांचा लाडका म्हणून मुंबई-महाराष्ट्रात नावाजलेला रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती, अर्थात ‘विद्यार्थ्यांचा राजा’. नाक्यावर बसणारी
- महेश चेमटे, मुंबई
महाविद्यालयीन तरुणांचा लाडका म्हणून मुंबई-महाराष्ट्रात नावाजलेला रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती, अर्थात ‘विद्यार्थ्यांचा राजा’. नाक्यावर बसणारी मंडळी ही टवाळगिरी करणारी असा सर्वसाधारण विचार करण्यात येतो. मात्र, याला बगल देत, गेली ३७ वर्षे रुईया महाविद्यालयाच्या नाक्यावर विद्यार्थ्यांचा राजा दिमाखात विराजमान होत आहे.
आधुनिक युगात वावरताना आपणही समाजाचे देणे लागतो,’ या विचारांच्या प्रेरणेने, मंडळातील विद्यार्थी पर्यावरणपूरक आणि सामाजिक भान जपणाऱ्या संदेश देखाव्याची आरास करतात. १९७८ साली बंधन श्रॉफ यांनी पुढाकार घेत, रुईया नाक्यावर गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. नाक्यावरील विद्यार्थ्यांकडे काळानुरूप हा वारसा येत गेला. विद्यार्थ्यांनी यथाशक्ती ‘वारसा गणेशोत्सवाचा’ जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. गेल्या काही वर्षांत डीजेच्या वाढत्या प्रभावाखाली तरुणाई वाहवत जात असल्याची चर्चा सहज कानी येते. मात्र, रुईया नाक्यावरील विद्यार्थी याला अपवाद ठरतात. राजाच्या आगमनाला बॅन्जो आणि विसर्जन मिरवणुकीला पारंपरिक पोशाखातील ढोलपथके यांनाच आमंत्रणे देतात. त्याचबरोबर, महाराष्ट्राची संस्कृती जपणारे मर्दानी खेळ पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह अन्य महाविद्यालयातील विद्यार्थीदेखील येथे गर्दी करतात.
मागच्या वर्षी दुष्काळामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्व स्तरातून मदत करण्यात आली. रुईया नाका मंडळानेदेखील रोख रक्कम देत, शेतकऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली, शिवाय गेल्यावर्षी ‘साडेतीन शक्तिपीठा’ची प्रतिकृती सादर करत, महिला सक्षमीकरणाचा नारा दिला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमानेच राजापुढे आरास आणि देखाव्याची मांडणी करण्यात येते. शिवाय बुद्धिदेवतेच्या आगमनाला आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत, गणेशाची अशीही भक्ती करता येते, याचे उदाहरण दिले आहे.
कोणत्याही स्वरूपाची ‘पावती’ न फाडता, स्वेच्छेने देणगी देणाऱ्यांकडून या गणेशोत्सव मंडळाचा कारभार चालतो. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी आपला पॉकेटमनी वाचवून राजासाठी स्वखुशीने देणगी देतात. परिसरातील रुग्णालये, नर्सिंग होम यांना उत्सवाचा त्रास होऊ नये, याचीही काळजी विद्यार्थी आवर्जून घेतात. आजही विद्यालयाचे माजी विद्यार्थी राजाच्या दर्शनासाठी आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत हजेरी लावतात.
नागरिकांचे कर्तव्य
सुरक्षित उत्सव साजरा करता यावा, यासाठी शहरातील पोलिसांचा खडा पहारा असतो. त्यामुळे पोलिसांना सहकार्य व्हावे, अशा पद्धतीने आम्ही उत्सव साजरा करतो; शिवाय विसर्जन मिरवणूक ही पोलिसांनी दिलेल्या वेळेतच पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आपल्याला सुरक्षित ठेवणाऱ्या पोलिसांची काळजी घेणे, हेच सुजाण नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत, रुईया नाका मंडळाचे उपखजिनदार तुषार दळवी यांनी व्यक्त केले.
सोशल मीडियावरही ‘राजा’
व्यक्त होताना तरुणाई सोशल मीडियाचा आधार घेते. याला नाक्यावरील मंडळी अपवाद कशी ठरतील? राजाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचे सर्व ‘अपडेट’ विद्यार्थ्यांसह भाविकांपर्यंत व्हायरल होत आहेत. शिवाय व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टिष्ट्वटर विविध पोस्ट, टिष्ट्वटच्या माध्यमाने विद्यार्थ्यांचा राजा हा सोशल मीडियाचाही राजा असल्याचे दिसून आले.