मुंबई : विक्रोळी पश्चिमेच्या पार्कसाइट येथे कच्छ युवक संघ घाटकोपर शाखा व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संभवनाथ जैन देरासर यांच्या केवीओ सेवा समाज हॉलमध्ये शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात तरुणांसोबत ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी एकूण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली.
या वेळी काही तरुण रक्तदात्यांनी पहिल्यांदाच रक्तदान केले. त्यांनी लोकमतच्या या रक्तदान शिबिराचे कौतुक केले तसेच रक्तदानाबद्दलची भीती दूर झाली असून यापुढे नेहमी रक्तदान करणार व इतरांनाही रक्तदान करायला सांगणार, अशी भावना त्यांनी या वेळी व्यक्त केली.
स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळात राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण कमी करण्यासाठी राज्याकडे पुरेसा रक्तसाठा असणे गरजेचे आहे. हेच लक्षात घेत लोकमतने राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे.
नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं या उपक्रमांतर्गत तरुण व ज्येष्ठ नागरिक रक्तदानासाठी पुढाकार घेत आहेत.
विक्रोळी येथे कच्छ युवक संघाच्या अँकरवाला रक्तदान अभियानात प्रमुख पाहुणे म्हणून कच्छ युवक संघाचे अध्यक्ष धिरज छेडा, साहाय्यक दाता मातुश्री लक्ष्मीबेन प्रेमजी रणशी संगोई, कपाया राजुल आर्ट घाटकोपर, शाखा संयोजक हसमुख सावला, सहसंयोजक अक्षित नागडा, लीना गाला, रक्तदान कनविनर निधी गाला, ऑगेन कनविनर जयश्री गाला हे सर्व मान्यवर व स्वयंसेवक उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला घाटकोपरच्या अनविक्षा ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.
फोटो कॅप्शन - विक्रोळी पार्कसाइट येथील कच्छ युवक संघाच्या घाटकोपर शाखेच्या अँकरवाला रक्तदान अभियानात सर्व स्वयंसेवक व रक्तदाते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.