मुंबई : स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘नातं रक्ताचं’ या रक्तदानाच्या महायज्ञाला रेल्वे कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. नॅशनल मजदूर युनियनच्या वतीने सेंट्रल रेल्वे लोको वर्कशॉप परळ येथे शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांपैकी ६२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी रक्ताचा मोठा तुटवडा भासला होता. आता लवकरच तिसरी लाट येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी नागरिकांनी या रक्तदानाच्या महायज्ञात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन या शिबिराच्या वेळी आयोजकांतर्फे करण्यात आले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे शाखाध्यक्ष आर.डी. नागवेकर, शाखा सचिव एस.आर. पंचगाम, शाखा कोषाध्यक्ष जी. सिसोदिया, सुनील नेटके, मन्नू बी, अतुल सुरवाडे, उमेश कदम, विक्की चोटोले, प्रशांत गोतवाल, सतीश शिंदे, संजय भोसले, राजन जी. अतुल शिरकर,अनिल माने, प्रकाश नंदकर, दीपक दास, विशाल गोंगे, राजेश एस, मकरंद वेदपाठक, स्मिता जाधव, अमृता बर्डे, आरती वांटेपियर, सविता चौगुले, दिव्यानी मोरे, किरण जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनाकाळात कोरोनामुळे रक्तपेढ्यात रक्ताचा तुटवडा आहे, अशा स्थितीत ‘लोकमत’ने पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरामार्फत रक्त गोळा करण्याचा संकल्प केला आहे, तो कौतुकास्पद आहे. त्याला नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा पाठिंबा आहे. प्रत्येकाने ‘लोकमत’च्या या सत्कार्यात रक्तदान करून आपले योगदान द्यावे.
- वेणु पी. नायर, महामंत्री, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन
-------------------
जयराम नाईक यांचे ७७ वेळा रक्तदान
मध्य रेल्वेचे चीफ वेल्फेअर इन्स्पेक्टर जयराम नाईक हे १९९५ पासून रक्तदान करत आहेत. त्यांनी आतापर्यंत ७७ वेळा रक्तदान केले आहे. ते म्हणाले, गरोदर महिला, कर्करोग रुग्ण ,थॅलिसीमिया रुग्ण यासाठी रक्ताची मोठी आवश्यकता असते. त्यांच्यासाठी रक्तदान करावे. रक्तदानाचा शरीरावर काहीही परिणाम होत नाही. त्यामुळे नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा.