Join us

कोविड काळात एनएसएस स्वयंसेवकांनी जपली सामाजिक बांधिलकी - उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्ट कार्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत उत्कृष्ट कार्य केले आहे. त्यांचे काम आपणा सर्वांसाठी आदर्श असल्याचे मत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले आहे.

शुक्रवारी मुंबई विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कोविड काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात आयोजित सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.

प्रत्येक जिल्ह्यातून एक अशा एकूण ३७ एनएसएस स्वयंसेवकांचा जिल्हास्तरावर सन्मान होणार आहे. त्यानंतर यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या १३ कोविड योद्ध्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सन्मान केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

विविध प्रकारचे उपक्रम राबविले

कोविडच्या या लढ्यात राज्यातील सर्व विद्यापीठांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपले अत्यंत महत्त्वपूर्ण असे योगदान दिले आहे. एनएसएस स्वयंसेवकांनी पोलीस मित्र, आरोग्य मित्र, महसूल मित्र म्हणून प्रत्यक्षपणे काम केलेले आहे. तसेच रक्तदान शिबिर, जनजागृती अभियान, परिसर निर्जंतुकीकरण, गरजूंना मास्क वाटप, भोजनाची व्यवस्था, अन्नवाटप, औषधांचे वाटप अशा प्रकारचे विविध उपक्रम राबविले आहेत.

विद्यार्थ्यांना सन्मानित करणे आपली जबाबदारी

विद्यार्थ्यांचे सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना सन्मानित करणे ही आपली जबाबदारी असल्याचे मत सामंत यांनी व्यक्त केले. राज्यामध्ये सामाजिक चळवळ निर्माण करण्यात एनएसएसचा मोलाचा वाटा असून राज्यातील एनएसएसचा आदर्श देशभरातल्या इतर राज्यांनी घ्यावा, असे काम राज्यातील चार लाख स्वयंसेवक करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली.