मुंबई : हेही दिवस जातील, असे म्हणत मुंबईमधील सूरज कुडपाने व राहुल तवटे या युवकांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या नातेवाइकांना मदत करण्यास सुरुवात केली. व्हॉटस्ॲप, फेसबुक, इंस्टाग्राम, अशा सोशल मीडियावर अनेक ओळखीतीलच लोक मदतीसाठी विचारणा करत होते आणि येथूनच सुरू झाला मदतीचा प्रवास.
एका फोनवरून सुरू झालेल्या दोघांच्या कार्याला हातभार लागला तो मोना ठक्कर आणि मेघा मसूरकर यांचा. सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर या टीमने समाजकार्यासाठी केला. समाजाप्रती आपले काहीतरी कर्तव्य आहे आणि ते पार पडण्याच्या उद्देशाने त्यांनी अनेक कोरोनाग्रस्त नागरिकांना व त्यांच्या परिवाराला निःशुल्क मदतीचा हात मिळवून दिला.
मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर नाही तर जिथून मदतीसाठी फोन येईल तिथे अत्यावश्यक सेवा देण्यात आली. मुंबई आणि आसपासच्या शहरासाठी चालू झालेले कार्य महाराष्ट्रच नव्हे, तर पूर्ण देशभर पसरले. दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, उत्तर प्रदेश, रांची, अशी शहरे जोडली गेली. देशभरातून अनेक या कार्यासाठी पुढे आलेल्या संस्था जोडल्या गेल्या.
संपूर्ण प्रवासात असे अनेक क्षण आले जिथे माणुसकीचे दाखले दिले गेले. यातील एक म्हणजे जुझर यांनी रमजान रोजा चालू असतानादेखील प्लाझ्मा दान केला. रात्री- अपरात्री बेडसाठी विचारणा करताना अनेक डॉक्टर्ससुद्धा योग्य मार्गदर्शन करत. पैशांसाठी जिथे कोरोना रुग्णांच्या परिवाराला त्यांच्या परिस्थितीचा कोणी गैरफायदा घेऊन फसवू नये त्यांना अशा संकटकाळात योग्य वेळेत योग्य ती माहिती उपलब्ध व्हावी याकरिता ही पूर्ण टीम अजूनही कार्यरत आहे.
...अशी झाली कामाची सुरुवात
कार्यासाठी आधी टीम बनवली, टीमचे धेय निश्चित केले. टीमच्या सहयोगाने आजही कार्य सुरू आहे. बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, प्लाझ्मा, औषधे कुठे उपलब्ध आहे, याची अपडेटेड माहिती टीमद्वारे कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांना देण्याचे कार्य केले गेले. सर्व आवश्यक माहितीचा डेटाबेस बनवला गेला. फॉर्मद्वारे प्लाझ्मा दान करणाऱ्यांचीची नोंदणी करण्यात आली. यादी जमा केली.