समाज बांधिलकी जपणारी ‘साफल्य’, ११७ कुटुंबांचे वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 06:44 AM2017-08-11T06:44:45+5:302017-08-11T06:44:45+5:30
चांदिवली येथील नावीन्यता, विविधता आणि एकता असलेल्या ‘साफल्य सहकारी गृहनिर्माण संस्थे’ची स्थापना १९९५ साली झाली.
- सागर नेवरेकर
मुंबई : चांदिवली येथील नावीन्यता, विविधता आणि एकता असलेल्या ‘साफल्य सहकारी गृहनिर्माण संस्थे’ची स्थापना १९९५ साली झाली. म्हाडा वसाहत इमारत क्रमांक ११ येथे ११७ कुटुंबे वास्तव्याला आहेत. इमारत चार मजली असून, तीन विंग्स आहेत. तसेच दोन सुरक्षा रक्षक आणि एक सफाई कामगार अविरतपणे सोसायटीत कार्यरत असतात. सोसायटीच्या आवारात २४ सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या परिसरात शोभिवंत फुलांची बाग आहे. आंबा, जांभूळ आणि नारळ यांसारखी मोठी झाडे सोसायटीच्या परिसरात आहेत.
सोसायटीमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन आहे. फुटबॉल, क्रिकेट, बॅटमिंटनच्या माध्यमातून सोसायटीतील मुलांनी विविध स्पर्धांत पारितोषिके मिळविली आहेत. सोसायटीच्या परिसरात इनडोर आणि आउटडोर गेम्स खेळले जातात. १८ वर्षांपासून कला क्रीडा महोत्सव स्पर्धा सुरू आहे. क्रीडा महोत्सव स्पर्धा २ ते २५ जानेवारीदरम्यान होते. दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जातो. मुलांसाठी शैक्षणिक आणि करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जाते. लहान मुलांसाठी नृत्य प्रशिक्षण व अभिनय कार्यशाळा होतात. महत्त्वाचे म्हणजे सोसायटीच्या मुलांसाठी ‘सामिप स्पोर्ट्स क्लब’ स्थापण्यात आला आहे. साफल्य सखी परिवार अंतर्गत महिलांसाठी पाककला स्पर्धेचे आयोजन केले जाते. पाककलेचे प्रशिक्षण देऊन स्पर्धाही भरवली जाते. रांगोळी स्पर्धा, हळदी कुंकू आणि विविध खेळ उत्साहात साजरे होतात. प्रत्येक वर्षी वार्षिक सहलीचे आयोजनदेखील करण्यात येते. जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर भरवले जाते. सोसायटीच्या परिसरात ज्येष्ठ नागरिक कट्टा आहे. वडीलधाºयांना प्रत्येक उपक्रमात पहिल्यांदा मान दिला जातो. वेळोवेळी त्यांना सन्मानितही केले जाते.
सोसायटीत दहीहंडी, नवरात्रौत्सव, गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी, स्वातंत्र्य दिन, मोहरम, नाताळ, बकरी ईद असे विविध सण दरवर्षी साजरे केले जातात. सणांची सजावट रेडिमेड वस्तूंपासून न करता मुलांच्या मदतीने केली जाते. सर्वधर्मीय लोक सोसायटीमध्ये राहतात. सर्व धर्माचे सण उत्साहात साजरे केले जातात. सर्व जण वार्षिक कार्यक्रमात हिरिरीने सहभागी होतात. सोसायटीमध्ये मालक आणि भाडेकरू असा भेदभाव केला जात नाही. इमारतीमध्ये पाण्याचे नियोजन उत्तमरीत्या केले जाते. सोसायटीमध्ये २४ तास पाणीपुरवठा असतो. त्याचप्रमाणे सोसायटीच्या सभासदांना पाणी वाचवण्यासाठी नोटीस बोर्ड आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. सोसायटी पूर्णपणे टँकरमुक्त आहे. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळेत इमारतीची साफसफाई केली जाते. शिवाय, डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरू नयेत, म्हणून औषधफवारणी केली जाते. एखादी समस्या निर्माण झाली तर ती सदस्य आणि सभासदांकडून सामोपचाराने सोडवली जाते. नोटीस बोर्डमार्फत आणि आठवड्याच्या बैठकीत सभासदांबरोबर संवाद साधला जातो. तसेच समस्येचे निराकरण केले जाते. सोसायटीचा कारभार पूर्णपणे पेपरलेस आहे. ३१ मार्चला सोसायटीचा मेन्टेनस क्लीअर करणारी सोसायटी म्हणून या सोसायटीची ओळख आहे. सोसायटीचे वार्षिक कामकाज सर्व सभासदांना प्रोजेक्टच्या माध्यमातून दाखवले जाते. सोसायटीचा कारभार पारदर्शक स्वरूपाचा आहे. रमेश प्रभू अध्यक्ष असलेल्या ‘महाराष्ट्र सोसायटीज् वेल्फेअर असोसिएशन’चे सदस्यत्व साफल्य सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित (म्हाडा कॉलनी)कडे आहे.
‘साफल्य’चे विविध सामाजिक उपक्रम
सावित्रीबाई फुले उद्यानात पाणपोई
चांदिवलीत कॉलनीच्या मध्यभागी दिशा फलक लावण्यात पुढाकार
गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तके-वह्यावाटप
कॅन्सरग्रस्त लोकांसाठी मदत निधी
ट्रस्टमार्फत अनेक सामाजिक कार्ये
हाती घेतलेले उपक्रम
इमारतीत उद्वाहक (लिफ्ट)ची व्यवस्था,सामिप ट्रस्टतर्फे रुग्णवाहिकेची सुविधा, अभ्यासिका आणि व्यायामशाळा, सभासदांना कचºयाचे डबे, पिशव्या पुरविणे, सोलार प्रकल्प आणि बोअरिंगची सोय
हाती घेतलेले उपक्रम
इमारतीत उद्वाहक (लिफ्ट)ची व्यवस्था,सामिप ट्रस्टतर्फे रुग्णवाहिकेची सुविधा, अभ्यासिका आणि व्यायामशाळा, सभासदांना कचºयाचे डबे, पिशव्या पुरविणे, सोलार प्रकल्प आणि बोअरिंगची सोय
कार्यक्रमांची रेलचेल
सोसायटीत विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्यक्रमात ३ वर्षांपासून ते ६० वर्षांपर्यंतचे उत्साही लोक सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद लुटतात.