Join us

मुंबई विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 6:33 PM

मुंबई विद्यापीठातर्फे ४६९ गरीब कुटुंबांना अन्नधान्यांचे वाटप : राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकाऱ्यांचा स्तूत्य उपक्रम

 

मुंबई : कोरोनामुळे उद्भवलेल्या संकटकालीन परिस्थितीत मुंबई विद्यापीठाने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. आदीवासी आणि बिगर आदिवासी गरीब कुटुंबाना दैनदिन जीवनात भेडसावणाऱ्या जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्यांचा पुरवठा करण्यासाठी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी पुढे सरसावले आहेत. जवळपास १०० हून अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वयंखर्चातून जवळपास १ लाख रुपये गोळा करून या गरिब आणि आदिवासी कुटुंबासाठी अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची सोय करुन दिली आहे. या सेवाभावी उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ३१४ आदिवासी कुटुंब आणि १५५ बिगर आदिवासी कुटुंबांना मदत करण्यात आली आहे.गरजूंना  देण्यात येत असलेल्या या जीवनावश्यक वस्तूंमध्ये तेल, तूरदाळ, कांदे, बटाटे, तीखट, मीठ, हळद, मोहरी, साबण अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. तर काहींना गरजेनुसार तांदूळ वाटप करण्यात आले. प्रत्येक कुटुंबाला देण्यात आलेले साहित्य साधारणपणे सात दिवस पुरेल इतके आहे. या सामानांचे वाटप करताना स्थानिक लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली असून ज्या बिगर आदिवासी कुटुंबांना मदत करण्यात आली ती कुटुंबे परराज्यातील असल्याचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक प्रा. सुधीर पुराणिक यांनी सांगितले. तसेच जोपर्यंत गरजवंताना गरज भासेल तोपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विशेष बाब म्हणजे काही जिल्ह्यातील कार्यक्रम अधिकारी गरजूंना शिजवलेले अन्न वाटत आहेत, तर काहींनी स्वयंखर्चातून परराज्यातील कामगारांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांनीही त्यांच्या दत्तक गावांमध्ये मदतीचा ओघ सुरू केला आहे. के. सी. महाविद्यालय चर्चगेट यांनी त्यांच्या दत्तक गाव करवाळे, सफाळे येथे सामुग्रीचे वाटप करण्यासाठी माजी स्वयंसेवक व प्राचार्यांनी पुढाकार घेतला तर सेंट जोसेफ महाविद्यालय विरार यांनी त्यांच्या दत्तक गावातील ८२ कुटुंबांना मदत केली. आर.डी. नेशनल महाविद्यालयानी त्यांच्या रायगड येथील दत्तक गाव पाणसई येथील ७२ कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल इतका धान्यसाठा उपलब्ध करुन दिला. त्याचबरोबर डीटीएस महाविद्यालय, लांजा महाविद्यालय, विवेक महाविद्यालय, भोसले महाविद्यालय अशा विविध महाविद्यालयांनी त्यांच्या दत्तक गावात मदत पोहचती केली आहे. विशेष बाब म्हणजे ही मदत पोहचती करण्यासाठी कोणीही घराबाहेर पडत नसून दत्तक गावातील दुकानदाराच्या खात्यात ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करुन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किंवा स्थानिक संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून सामानांचे वितरण करण्यात येत आहे.---------------------------------कोरोनाच्या या संकटकालीन परिस्थितीत आदिवासी आणि बिगर आदिवासी कुटुंबाना दैनदिन जीवनावश्यक वस्तू आणि अन्नधान्यांची चणचण भासू नये म्हणून या गरीब कुटुंबाना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने सामाजिक बांधिलकी जोपासत हा उपक्रम हाती घेतला आहे. गरजवंतापर्यंत मदतीचा ओघ असाच अविरत सुरू राहणार.

– प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

टॅग्स :अन्नकोरोना सकारात्मक बातम्या