Join us

राजकारणात महिलांना समान स्थान दिल्यास सामाजिक समतोल राखला जाईल - नीलम गो-हे      

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 7:19 PM

“आपल्याकडे महिलांना समान संधी देण्याची परंपरा सुरु झाली आहे. यामुळे महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. मात्र त्यात अदयापही अधिकार असलेल्या, निर्णय घेऊ शकतील अशा पदांवर काम करणा-या स्त्रियांची संख्या मात्र बोटावर मोजण्याइतकीच दिसते आहे.

 मुंबई : “आपल्याकडे महिलांना समान संधी देण्याची परंपरा सुरु झाली आहे. यामुळे महिला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. मात्र त्यात अदयापही अधिकार असलेल्या, निर्णय घेऊ शकतील अशा पदांवर काम करणा-या स्त्रियांची संख्या मात्र बोटावर मोजण्याइतकीच दिसते आहे. युएनविमेनच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या परिषदेत ठरल्याप्रमाणे सन २०३० पर्यंत सर्वच क्षेत्रात महिलांना ५० टक्के स्थान मिळावे यासाठी काम करण्यात येणार आहे. अनेक विकसित देशांतही महिलांना अजूनही हा समान दर्जा मिळालेला नाही. भारतीय समाजात स्त्री आपल्या कार्याच्या जोरावर राजकारणांमध्ये यश प्राप्त करीत आहे. पण राजकारणासारख्या समाजाशी सर्व प्रकारे जोडल्या गेलेल्या क्षेत्रात महिलांना समान संधी व दर्जा देण्याची गरज आहे. यामुळे सामाजिक विकासाचा समतोल राखण्यास मदत होईल,” असे मत आज शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गो-हे यांनी येथे व्यक्त केले.                 महाराष्ट्र राज्य महिला आयोग व भारतीय विद्या भवनचे भवन्स महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महिला सबलीकरण’ विषयावरील परिसंवादांमध्ये आज त्यांचे पहिलेच व्याख्यान झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.  महिला आयोगाच्या सदस्य सचिव व राज्य शासनाच्या उपसचिव  डॉ. मंजूषा मोळवणे याही उपस्थित होत्या.डॉ. गो-हे म्हणाल्या, "महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिलांना अनेक संधी उपलब्ध होत आहेत. आर्थिक क्षेत्रात महिलांना अधिक विकासाच्या संधी मिळत नाहीत. त्याचसोबत आर्थिक स्तरावर असमानता दिसून येत आहे. अनेक क्षेत्रात रोजगार करीत असताना वेतनात तफावत असल्याचे निदर्शनास येत आहे. महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, नोकरीच्या ठिकाणची महिलांना देण्यात येणारी हीनतेची वागणूक अशा समस्या आहेतच. पुरुषप्रधान मानसिकतेचे,महिलांना प्रत्येक वेळी डावलण्याच्या पद्घतीचे चटके तिला बसतच आहेत. समस्याग्रस्त महिलांना तात्काळ दिलासा देणारी यंत्रणा आपल्याकडे अजून उपलब्ध नाही. ही एक खंत आहे. स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून मागील ३४ वर्षांमध्ये अनेक महिलांसाठी काम करण्यात आले असून यामुळे अनेक महिला्ंना राजकारणामध्ये प्रवेश करून आपले अस्तित्व टिकविण्याचे धारिष्ट्य त्यांच्यात आले आहे. मात्र राजकारणामध्ये विषयाला धरुन काम केल्यास त्याला अधिक उपयोगिता प्राप्त होते. आत्मकेंद्रित व स्वत:चाच उदो उदो करणारे राजकारण व राजकारणी टिकत नाहीत." येत्या काळात विदयार्थ्यांनी महिला विकासासाठी काम करणारे दूत व्हा असे आवाहन त्यांनी विदयार्थ्यांना केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यात सुरु केलेल्या महिलाविषयक उपक्रमांचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. डॉ. मोळवणे यांनी महिला आयोगाचे कार्य व या उपक्रमाबाबत पार्श्वभूमी विषद केली. महिलांसाठी करित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महाविद्यालयाच्या प्र‍ाचार्या श्रीम. व्ही. जे. कच्छी, प्रा. प्रज्ञा लोखंडे, शिवसेना पदाधिकारी शरद जाधव व महाविद्यालयाच्या ३०० विदयार्थी विदयार्थिनी आणि शिक्षक कार्यक्रमाला उपस्थित होते.

टॅग्स :नीलम गो-हेमुंबई