मुंबई : दिव्यांग व्यक्तींना समाजात सहज वावरण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड मिळावी या उद्देशाने आयआयटी मुंबईत दोन दिवसीय अभ्युदय सामाजिक मेळावा पार पडला. या मेळाव्यात देशभरातील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या होत्या. राज्यासह देशातील विविध सामाजिक विषयांवर या महोत्सवात चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबरीने सामाजिक समस्यांवरील ‘अॅक्शन प्लॅन’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत १५ गट अंतिम फेरीत आले होते. यामध्ये दिल्लीच्या राहत या प्रकल्पाला प्रथम पारितोषिक मिळाले. दिल्लीतील वस्ती पातळीवरील स्वच्छतागृहे, स्वच्छता याविषयावर राहत गु्रप काम करीत आहे. अनेकदा वस्ती पातळीवरील व्यक्तींना स्वच्छतागृह वापरण्यासाठी अनेक प्रश्न असतात. अशा व्यक्तींसाठी इनॅक्ट्स शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी काम करीत आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचे सादरीकरण येथे केले. लहान मुलांना स्वच्छतागृहे वापरण्यासाठी सोपे जावे यासाठी राहत ग्रुपने केलेल्या बदलांचे सर्वांनी कौतुक केले. ‘अॅक्शन प्लॅन’ स्पर्धेत कचरा, प्रदुषण, शिक्षण, स्वच्छता अशा विविध विषयांवर काम करणाऱ्या व्यक्तींनी, ग्रुप्सनी सादरीकरण केली. रात्री उशीरा टॅक्सीनी प्रवास करताना महिलांना असुरक्षित वाटते. अशावेळी महिलांनी प्रवास करताना कोणत्या रस्त्यांनी प्रवास करावा अथवा कोणत्या मार्गाने प्रवास करणे टाळावे याविषीय माहिती देणारे अॅप्लिकेशन तयार केले आहे. सध्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर असल्याने वातावरणातील धूलीकण आणि कार्बनडाय आॅक्साईड विलग करणाऱ्या यंत्राचे येथे सादरीकरण केले. ग्रामीण भागात संगणकाचा प्रसार करण्यासाठी काम करणाऱ्या ‘उडान’ ग्रुपनेही येथे सादरीकरण केले. या महोत्सवात दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन व्यवहार करताना अडचणी दूर करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यंत्र, साधनांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. पायांना अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींसाठी मोफत कृत्रिम पाय उपलब्ध होऊ शकतो याविषयी जनजागृती करण्यासाठी भगवान महावीर विकलांग सहायता समितीने स्टॉल लावला होता. त्याचप्रमाणे दृष्टिहीन व्यक्तींचे दैनंदिन व्यवहार सुरळीत होण्यासाठी उपलब्ध असणाऱ्या साधनांचे स्टॉल्स येथे लावण्यात आले होते. (प्रतिनिधी)
आयआयटीत सामाजिक परिवर्तनाचा मेळा
By admin | Published: January 23, 2017 6:05 AM