भाजपाविरोधी भूमिकेसाठी मनसेला राष्ट्रवादीकडून ‘सोशल’ रसद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:33 AM2019-03-25T01:33:04+5:302019-03-25T01:33:46+5:30
निवडणुकीत भाजपाला हरवायचे आहे. त्यासाठी त्यांच्याविरोधात मिळेल ती माहिती जमा करा, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच कार्यकर्ता मेळाव्यात केले होते.
मुंबई : निवडणुकीत भाजपाला हरवायचे आहे. त्यासाठी त्यांच्याविरोधात मिळेल ती माहिती जमा करा, असे आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच कार्यकर्ता मेळाव्यात केले होते. विशेष म्हणजे मनसे पदाधिकारी त्यानुसार कामाला लागले असून, त्याला सोशल मीडियातील राष्ट्रवादी समर्थकांचीही साथ मिळत आहे. दोन्ही पक्षांचे समर्थक एकमेकांच्या पोस्ट व्हायरल करत असून, एकमेकांना पूरक माहिती सोशल मीडियात फिरत राहील, याची काळजी घेत आहेत.
राज ठाकरे यांनी वांद्रे येथील कार्यकर्ता मेळाव्यात मनसैनिकांना इंटरनेट आणि सोशल मीडियात भाजपाविरोधात मिळेल ती माहिती गोळा करण्याचे आणि त्याचा प्रसार करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपाविरोधात पोस्ट फॉरवर्ड करण्यास सुरुवात केली आहे.
त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमकडून रसद पुरविली जात आहे.
विशेष म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूने सुरू असलेला हा सारा प्रकार काही राज समर्थकांना आवडणारा नाही. ही शक्यता गृहीत धरून ‘राज यांची यंदाची चाल म्हणजे इतिहासात बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय खेळींचे अनुकरण’ असल्याचे व्हिडीओ राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया समर्थकांकडून फॉरवर्ड केले जात आहेत. १९६९च्या निवडणुकीत बाळासाहेबांनी उमेदवार उभे केले नव्हते, काँग्रेसशी समजोता केला होता, पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे घेतले होते, असा दावा करणारे व्हिडीओ फॉरवर्ड केले जात आहेत.
‘मतपरिवर्तन करा; सरकारचे अपयश लोकांसमोर मांडा’
भाजपाविरोधी मोहिमेसाठी मनसे प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी फेसबुकवर भलीमोठी पोस्ट टाकून मनसैनिकांना एकप्रकारचा अभ्यासक्रमच दिला आहे. सरकारचे अपयश लोकांसमोर मांडा. त्यासाठी स्वत: इंटरनेटवर जाऊन खात्री करून घ्या. अभ्यास करा, असे सांगतानाच मागच्या वेळी ज्यांनी मोदींना मतदान केले त्यांच्याशी बोला. त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी माहितीचा वापर करा. मोदींना मतदान केले आहे, अशा किमान तीन लोकांना रोज प्रत्यक्ष भेटा. नुसता व्हॉट्सअॅप नको, फेसबुक संदेश नको. जे थोडे वेगळा विचार ऐकू शकतात, चर्चा करू शकतात, त्यांना तुमचा राजकीय विचार पटवून द्या, असे आवाहनही अनिल शिदोरे यांनी केले आहे.