सोशल मीडिया ठरतेय ‘समुपदेशना’चे माध्यम!, सुसंवाद वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 02:41 AM2020-08-31T02:41:49+5:302020-08-31T02:43:10+5:30
गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचे मळभ पसरलेले पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत चाललेल्या रुग्णसंख्येमुळे आणि टाळेबंदीमुळे सामान्य नागरिक मानसिकरीत्या हवालदिल झाले आहेत.
- स्वप्निल कुलकर्णी
मुंबई : कोरोनाच्या आजाराला आणि टाळेबंदीला कंटाळलेल्या सामान्य नागरिकांच्या मनात नकारात्मक भावना बळावत आहेत. कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेली भीती, नैराश्य दूर करण्यासाठी अनेक जण एकमेकांना धीर देत फेसबुक, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियावर ‘समुपदेशन’ करताना दिसत आहेत. या सकारात्मकतेमुळे आणि जनजागृतीमुळे दुधारी शस्त्र म्हणून ओळख असलेला सोशल मीडिया ‘समुपदेशना’चे माध्यम म्हणून पुढे येताना दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाचे मळभ पसरलेले पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत चाललेल्या रुग्णसंख्येमुळे आणि टाळेबंदीमुळे सामान्य नागरिक मानसिकरीत्या हवालदिल झाले आहेत.
एरवी स्टंटबाजी आणि ट्रोल करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘सोशल मीडिया’ माध्यमाच्या या सकारात्मक बाजूमुळे आता खºया अर्थाने इतरांना जगण्यासाठी मानसिक बळ आणि प्रेरणा मिळत आहे. कोरोनाच्या या युद्धात डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी हे ‘कोरोना योद्धे’ अहोरात्र झटत आहेत. एकूणच कोरोनाच्या या युद्धात कोरोना योद्ध्यांचे काम, त्यांचा त्याग समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समाजमनाचे हे चित्र बदलण्यात ‘सोशल मीडिया’ महत्त्वाचे योगदान देत आहे.
कोरोना संकटाच्या काळात कोरोनाचा समर्थपणे मुकाबला करून त्यातून सहीसलामत बाहेर पडलेली मंडळी आपला ‘अनुभव’ सोशल मीडियावर व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या असह्य होणाºया लॉकडाऊनच्या काळात, कोरोनाच्या भीतीखाली सोशल मीडियामुळे संपूर्ण समाजमनाला एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकण्याचा कानमंत्र
‘आपल्याला आजाराशी लढायचं आहे, रुग्णाशी नाही’ हे वाक्य आपल्याला अनेकदा ऐकायला मिळतं. आपण सर्वांनी कोरोना विषाणूविरोधातील हे युद्ध जिंकण्याचा निर्धार केला आहे. ‘जनजागृती’ हाच कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकण्याचा कानमंत्र आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पोलीसही कोरोनाविरुद्धच्या या युद्धात सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करीत आहेत.
कोरोनामुळे लोकांमध्ये भावनिक संकटाची लाटच आल्याचं जाणवतंय. फोनवर बोलणारे, आपल्या समस्यांवर उपाय शोधू पाहणारे अनेक जण आपल्या आरोग्याची भीती, नोकरीवर आलेली गदा, नातेसंबंधांत वाढलेली दरी, वाढतं एकाकीपण यावर बोलत आहेत. असं असताना ‘कोरोनामुक्त’ झालेले असंख्य जण सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरांना धीर देण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही गोष्टच इतरांना जगण्यासाठी बळ देईल, असं वाटतं.
- डॉ. राजेंद्र बर्वे, सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ