Join us

बिहार निकालांबाबत सोशल मीडियावर फटाके

By admin | Published: November 10, 2015 2:30 AM

बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीने भाजपाला धूळ चारली. भाजपाच्या या दारुण पराभवाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीने भाजपाला धूळ चारली. भाजपाच्या या दारुण पराभवाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. हॅश टॅग बिहार, हॅश टॅग बिहार इलेक्शन आणि हॅश टॅग बिहार रिझल्ट हे टिष्ट्वटरवर टॉप ट्रेन्डवर होते. ‘दिवाळीचा हंगाम असल्याने जवळच्या भाजपाच्या कार्यालयात फटाके सवलतीच्या दरात मिळत आहेत,’ अशी खोचक प्रतिक्रिया देत नेटिझन्सनी भाजपाला चिमटा काढला, तर दुसरीकडे भाजपाच्या पाठीराख्यांनी मात्र बिहारमध्ये पुन्हा ‘जंगलराज’ आल्याचे म्हटले.गोमांसबंदीच्या मुद्द्यावरूनही अनेकांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. ‘भाजपाच्या पराभवाचे कारण म्हणजे गायींना या निवडणुकीत मतदान करायला परवानगी नव्हती, अशी प्रतिक्रिया एका नेटिझनने व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे ‘जो ना कटे आरी से, वो कटे बिहारी से’ अशा शब्दांत बिहारी जनतेने दिलेल्या कौलाचे वर्णन केले आहे. ‘हा लोकशाहीचा विजय असून हा मुद्दा बिहारी विरुद्ध बाहरी असा होता,’ असे म्हणत भाजपा नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी टिष्ट्वटरवरून घरचा अहेर दिला आहे. ‘किमान आता तरी बिहारने त्यांचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावा. जोक पूर्ण’, अशी प्रतिक्रिया शिरीष कुंदरने व्यक्त केली आहे, तर शत्रुघ्न सिन्हा आता अमित शहाकडे जाऊन म्हणेल, ‘खामोश,’ असे टिष्ट्वट माधव नारायणन यांनी केले आहे.व्यंगचित्रकारांनीही या परिस्थितीवर चित्रांमधून भाष्य केले आहे. एका व्यंगचित्रात नरेंद्र मोदी व अमित शहा गायीला चारा खाऊ घालत आहेत, तर मागच्या बाजूने नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव त्याच गायीचे दूध काढताना दाखवले आहेत. दुसऱ्या व्यंगचित्रात दिवाळीच्या रॉकेटला नरेंद्र मोदी, अमित शहा आणि गाय यांना बांधून हे ‘मेड इन पाकिस्तान’ रॉकेट असावे, असा शेरा मारला आहे. भाजपाच्या बाजूने झुकलेल्या एग्झिट पोलचीसुद्धा सोशल मीडियावर टर उडवली आहे. चाणक्यचे चित्र काढून ‘मेरे नाम से सर्व्हे करनेवालो, बिहार की जनता माफ नहीं करेगी,’ अशा शब्दांत टोला लगावला आहे. (प्रतिनिधी)