Join us

सोशल मीडिया भावुक, इरफानच्या अकाली एक्झिटने चाहते शोकाकुल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 1:19 PM

इरफानच्या प्रवक्त्याने आज सकाळीच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र, यानंतर काहीच तासात इरफानच्या मृत्यूची बातमी आली

मुंबई - बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत असलेल्या इरफानने आज अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत असताना त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि चाहते शोकसागरात बुडाले. बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली. इरफानच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावरुन इरफानला श्रद्धाजली वाहण्यात येत आहे. इरफानचे चाहते भावुक झाले असून आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या अकाली एक्झिटने अनेकांनी दु:खी शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. 

इरफानच्या प्रवक्त्याने आज सकाळीच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र, यानंतर काहीच तासात इरफानच्या मृत्यूची बातमी आली. काही दिवसांपूर्वा इरफानची आई सईदा बेगम यांचे जयपूरमध्ये निधन झाले होते. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे इरफान जयपूरमध्ये पोहोचू शकला नव्हता. त्यानंतर काल इरफानची तब्येत बिघडली आणि त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. अखेर आज इरफानची मृत्युसोबत सुरु असेलली झुंज संपली. आपल्या अभिनयातून कोट्यवधी भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या इरफानच्या मृत्युची बातमी समजताच चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. अनेकांनी फेसबुकवरुन इरफानचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्यास श्रद्धांजली वाहिली. तर, काही वेळातच ट्विटरवर इरफान खान हा हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. देशातील राजकीय नेत्यांनी आणि बॉलिवूड कलाकारांनीही इरफान खानच्या अभिनयाचं कौतुक करत, देशान महान कलावंत गमावल्याची भावना व्यक्त केली आहे. 

दरम्यान, दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये इरफानने त्याच्या आजाराबद्दल आपल्या फॅन्सना सांगितले होते. इरफानला न्यूरो इंडोक्राइन ट्यूमर हा आजार होता. इरफानच्या आजारावर लंडनमध्ये उपचार सुरु होते. दीर्घकाळ उपचार घेतल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये इरफान भारतात परतला होता. यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ या सिनेमाचे शूटींग सुुरू केले होते. नुकताच हा सिनेमा रिलीज झाला होता़ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

टॅग्स :इरफान खानबॉलिवूडसोशल मीडियाट्विटरमृत्यू