मुंबई : अभियांत्रिकी क्षेत्राचे जनक भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिन म्हणजेच १५ सप्टेंबर हा दिवस ‘अभियंता दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यांचे जन्मराज्य कर्नाटकामध्ये या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यात येते. शनिवारी ‘इंजिनिअर्स डे’ निमित्त विविध कार्यक्रम साजरे होत असतानाच इंजिनिअर्सना सोशल मीडियावरुन खूप ट्रोल करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
ट्विटरवरुन #इंजिनिअर्स डे असा हॅशटॅग वापरुन मेसेज व्हायरल होत होते. सध्याच्या इंजिनिअर्सची अपेक्षा आणि खरी परिस्थिती यावर मेसेज तयार करुन व्हायरल करण्यात येत होते. ‘इंजिनिअरिंग सोडून दे, चहाचा धंदा टाक’ असा सल्ला काही युजर्संनी दिला. सध्या इंजिनिअरर्सची संख्या जास्त असून नोकऱ्या कमी असल्याने ‘बेरोजगार’ इंजिनिअर्सना ट्रोल करण्यात आले. फेसबुकवर इंजिनिअर्सना ट्रोल करण्यासाठी विशेष पेज तयार करण्यात आले. यावर इंजिनिअर्स डे शुभेच्छा देऊन विनोदही करण्यात आले. इंजिनिअरचे खरे आयुष्य कसे असते, अभ्यास कसा असतो, नोकऱ्या कशा असतात याबाबतीत इंजिनिअरचे गंमतीदार सत्य या पेजवरुन दाखविले जात आहे. व्हाट्सअॅप स्टेट्सवर अनेक युजर्संनी अभियांत्रिकी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, सर एम. व्ही. यांच्या १५७ व्या जन्मदिनानिमित्त गुगलने डूडलद्वारे त्यांना मानवंदना दिली. डूडलमध्ये सर एम. व्ही. यांचे रंगीत चित्र दाखवून त्यांच्या रंगीत चित्रामागे ब्रीजचे चित्र दाखविले होते. यामागचे कारण असे की, सर एम. व्ही. यांनी कर्नाटक येथील कृष्ण राजा सागर सरोवर आणि धरण या प्रकल्पात लक्षणीय कामगिरी करुन धरण बांधले. या धरणामुळे अनेक शहराची पाण्याची तहान भागविली जात आहे.