सोशल मीडियावर ‘...#प्रिये’चा धुमाकूळ
By admin | Published: April 16, 2017 03:23 AM2017-04-16T03:23:06+5:302017-04-16T03:23:06+5:30
सोशल साइट्सवर कोणता शब्द ट्रेण्ड होईल हे सांगता येणे जरा कठीणच आहे. सध्या सोशल साइट्सवर ‘प्रिये’ हा शब्द आणि त्यासोबतच्या दोन ओळीतील कविता
मुंंबई : सोशल साइट्सवर कोणता शब्द ट्रेण्ड होईल हे सांगता येणे जरा कठीणच आहे. सध्या सोशल साइट्सवर ‘प्रिये’ हा शब्द आणि त्यासोबतच्या दोन ओळीतील कविता ट्रेण्डिंगमध्ये आहेत. सोशल साइट्सवर अॅक्टीव्ह असणारा प्रत्येक जण दोन ओळींची कविता करतो आणि त्यासोबत #प्रिये हा हॅशटॅग जोडून पोस्ट करत आहे. परंतु नेमका हा ट्रेण्ड आला कुठून, असा प्रश्न सध्या नेटिझन्सना पडला आहे.
असे म्हटले जात आहे की, ‘तुम एम ए फर्स्ट डिवीजन हो, मैं हुआ मैट्रिक फेल प्रिये, मुश्किल है अपना मेल प्रिये, ये प्यार नहीं है खेल प्रिये...’ या जुन्या हिंदी कवितेमुळे हा ट्रेण्ड सुरू झाला आहे. श्रीमंत घरातील प्रेयसी आणि त्या तुलनेत गरीब असलेला प्रियकर असा या कवितेचा आशय आहे. तर, काहींच्या म्हणण्यानुसार, हा ट्रेण्ड कवी नारायण पुरींच्या ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ या मराठी कवितेमुळे सुरू झाला आहे.
‘‘प्रेमाचा जांगडगुत्ता गं.. जीव झाला हा खलबत्ता गं..
उखळात खुपसले तोंड प्रिये.. मुसळाचा तुंबळ रट्टा गं..
तू लाजाळू परी कोमल गं.. मी निवडुंगाचे झुडूप प्रिये..
तू तुळशीवाणी सत्त्वशील.. मी आग्याबोंड वेताळ प्रिये’’
अशा त्यांच्या कवितेच्या सुरुवातीच्या ओळी आहेत. असो, परंतु ही ‘प्रिये’ सध्या सोशल मीडियावर ट्रेण्ड करत आहे. (प्रतिनिधी)
- मी मुक्त हिंडणारा वळू , तू संस्कृतीच्या दावणीला बांधलेली गरीब गाय #प्रिये
- तू आयफोन ७, मी नोकिया १०५ #प्रिये
- तू एअर इंडिया, मी गायकवाड #प्रिये
अशी काही #प्रियेची उदाहरणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.