मुंबई : सुदृढ लोकशाहीसाठी वादविवाद स्पर्धा सारखे उपक्रम आवश्यक आहेत. सोशल मीडियाचा वापर विधायक पद्धतीने करुन व्यापक समाजहित साधावे, असे आवाहन राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी बुधवारी केले. महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्य आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
'या सभागृहाची अशी धारणा आहे की, सोशल मीडिया ही लक्ष विचलीत करणारी धोकादायक बाब आहे'. या विषयावर राज्यातील सर्व जिल्ह्यात आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा झाल्या.पोलीस विभागाच्या ७ परिक्षेत्रातून नमूद विषयाच्या बाजूने आणि विरुद्ध बाजूने मते मांडण्याकरिता प्रत्येकी २ याप्रमाणे एकूण १४ विद्यार्थ्यांची अंतिम फेरी झाली. त्याचे उदघाटन महासंचालक सुबोध जायस्वाल यांच्या हस्ते झाले.
कुंभकोणी म्हणाले, सोशल मिडीयाचा वापर राज्यातील पोलीस विभाग चांगल्या प्रकारे करीत असून गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम करत आहे. हा कार्यक्रम पोलीस मुख्यालयात घेतला असल्यामुळे राज्यातील सर्व अधिकारी एकत्र आले. सोशल मीडियाच्या कायद्यासंदर्भात पालकांनी पाल्यांशी सुसंवाद साधून यासंदभार्तील साधकबाधक बाबी पाल्यांच्या लक्षात आणून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी पोलीस वाहतूक विभाग, बॉम्ब शोधक व नाशक पथक, बिनतारी संदेश, शस्त्र प्रदर्शन, पोलीस बॅन्ड यांचे मुख्यालयाचे हिरवळीवर प्रदर्शन आयोजिले होते. जयहिंद कॉलेजचे प्राचार्य अशोक वाडिया, पोलीस महासंचालक तांत्रिक व विधी हेमंत नगराळे, अपर पोलीस महासंचालक रजनीश सेठ, कुलवंत कुमार आणि राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त अमितेश कुमार,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार आदी उपस्थित होते.
विजेत्यांनी नावे अशी :बेस्ट टिम : नाशिक, कोल्हापूर, बेस्ट स्पीकर : अक्षता देशपांडे, (नाशिक) वैष्णवी रमेश जाधव , द्वितीय बेस्ट स्पीकर : यशवंत खाडे, (पुणे ) व पराग बद्रिके,( कोल्हापूर)