मॅरेथॉनमध्ये सामाजिक जाणिवेचा संदेश

By admin | Published: January 18, 2016 02:47 AM2016-01-18T02:47:50+5:302016-01-18T02:47:50+5:30

रोजच्या जीवनात घड्याळाच्या काट्यावर धावणे हे मुंबईकरांसाठी नवीन नाही. पण आज बहुतांश मुंबईकर धावले ते सामाजिक भान जपण्यासाठी.

Social message in the marathon | मॅरेथॉनमध्ये सामाजिक जाणिवेचा संदेश

मॅरेथॉनमध्ये सामाजिक जाणिवेचा संदेश

Next

प्रवीण दाभोळकर,  मुंबई
रोजच्या जीवनात घड्याळाच्या काट्यावर धावणे हे मुंबईकरांसाठी नवीन नाही. पण आज बहुतांश मुंबईकर धावले ते सामाजिक भान जपण्यासाठी. १३व्या भव्य मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने विविध शहरे, राज्यातून आलेल्या स्पर्धकांमध्ये सामाजिक बांधिलकीचे भान या वर्षीही पाहायला मिळाले. पर्यावरण संवर्धन, बेटी बचावो - बेटी पढावो, असे सामाजिक संदेश देत अनेक खाजगी, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वसामान्य मुंबईकर आणि सेलीब्रिटीजही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
मुंबई मॅरेथॉनमधल्या २१ किलोमीटर्स अंतराच्या शर्यतीला ५ वाजून ४0 मिनिटांनी वरळी डेअरी येथून तर छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून मुख्य मॅरेथॉनमधल्या विविध गटांच्या शर्यतींना सुरुवात झाली. विविध सामाजिक संस्थांमध्ये बेघर तरुणींसाठी काम करणाऱ्या ऊर्जा संस्थेच्या लक्ष्मी भाटीया आणि रूपाली साठे या दोन तरुणी मुंबई मॅरेथॉनच्या हाफ मॅरेथॉन गटात सहभागी झाल्या होत्या. संस्थेच्या निधी संकलन अधिकारी नेहा सेठ्ठी म्हणाल्या, लक्ष्मी आणि रूपाली या दोघींची मुंबई मॅरोथॉनची पहिलीच वेळ होती. गेल्या दोन वर्षांपासून दोघीही ऊर्जा संस्थेच्या शेल्टरमध्ये राहत असून, महिनाभर मेहनत करून सामाजिक जाणिवेचा संदेश पोहोचविण्यासाठी दोघी धावल्या.
महिंद्रा ग्रुपचे कर्मचारी हे नन्ही कली या प्रकल्पाला प्रोत्साहन देण्यासाठी धावले. पाचशे कर्मचाऱ्यांनी ‘बेटी बचावो, बेटी पढावो’चा संदेश मुंबईकरांना देत मॅरेथॉन पूर्ण केल्याचे ग्रुपचे कर्मचारी राजेश जाधव यांनी सांगितले. आम्ही वनशक्ती आणि कांदळवन कक्ष, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरोथॉनच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिल्याचे मुंबई कांदळवनचे सहायक वनसंरक्षक मकरंद घोडकर यांनी सांगितले. सीएसटी स्थानकाजवळ मुस्लीम तरुण शांतता आणि एकोप्याचा संदेश देताना दिसले. यासोबत अनेक स्पर्धक लक्ष वेधून घेत होते.

Web Title: Social message in the marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.