जगातील सगळ्यात ॲडव्हान्स सोशल ह्युमनोईड : काेराेनामुळे व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १.०२ मीटर उंच असलेली आणि माणसाच्या कान, ओठ, तोंड या अवयवांप्रमाणे कृत्रिम अवयव असूनही संवाद साधणारी पहिली ॲडव्हान्स सोशल ह्युमनॉईड यंदा टेकफेस्टमधील हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या तयारीत आहे. समाजात वावरणे, व्यक्त होणे, संवाद साधणे ही नीनाची वैशिष्ट्ये असून जगातील ॲडव्हान्स सोशल ह्युमनॉईड रोबोट म्हणून नीनाची ओळख आहे.
टेकफेस्टमध्ये नीनाला यूट्युबद्वारे सादर करण्यात येणार असून हजारो विद्यार्थ्यांना या ह्युमनोईडशी संवाद साधता येणार आहे. मागील ४ वर्षे या ह्युमनोईडचे निर्माते या रोबोटला सामाजिक वातावरणात अभिव्यक्त होणे, संवाद साधणे यासाठी प्रशिक्षण देत आहेत. इतकेच नाही तर अल्झायमरसारख्या रोगाचे निदान करण्यासाठी वासिक असणाऱ्या न्यूरोसायकॉलॉजिकल चाचण्या ही नीना लवकर पार पाडू शकणार आहे. यंदाच्या टेकफेस्टचे आणखी एक आकर्षण म्हणजे अमेरिकेतील व्हर्जिन हायपरलूपचे सादरीकरण असणार आहे. प्रत्येक पॉडमध्ये किमान २८ माणसांची क्षमता ठेवून, पर्यावरणाची कोणतीही हानी न करता वाऱ्याच्या वेगाने ट्रान्स्पोर्टेशन करण्याच्या यशस्वी चाचण्या व्हर्जिन हायपरलूपने पार पाडल्या आहेत.
सर्वात मोठा टेकफेस्ट म्हणून ओळख असलेल्या मुंबई आयआयटी टेकफेस्ट २०१९-२० ला सुरुवात झाली असून यावर्षीचा टेकफेस्ट हा मुंबई आयआयटीच्या कॅम्पसमध्ये न होता व्हर्च्युअल आणि ऑनलाइन माध्यमातून आयोजित केला जात आहे. ८ डिसेंबर ते १३ डिसेंबर पहिला आठवडा व त्यानंतर टेकफेस्टचा दुसरा आठवडा, अशाप्रकारे डिसेंबरच्या दोन आठवड्यांत या टेकफेस्टचे आयोजन केले आहे. यावर्षी कोरोना स्थिती पाहता हा टेकफेस्ट व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर आयोजित केला जाईल
* काेविडीएट स्पर्धा
दरवर्षी कॅम्पसमध्ये होणाऱ्या स्पर्धासुद्धा व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर आयोजित केल्या जाणार असून स्पर्धक त्यात सहभागी होऊ शकतील. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी किंवा वॅक्सिन निर्मितीबाबत नव्या संकल्पना, पर्याय समोर घेऊन येणाऱ्यासाठी खास कोविडीएट स्पर्धेचेसुद्धा आयोजन यावर्षी करण्यात आले असून यासाठी १.२५ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.